तासगाव : गुहागर-विजापूर महामार्गावर योगेवाडी (ता. तासगाव) येथे भरधाव मोटार व मालवाहू टेम्पोच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. 14 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडला. सोपान मारुती सरगर (वय 34), नामदेव ज्ञानू सरगर (31, दोघे रा. कोळे, ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात जितेंद्र ऊर्फ जितू रमेश मोरे, त्यांची आई रंजना रमेश मोरे व वडील रमेश लिंगाप्पा मोरे (सर्व रा. नराळे, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोपान व नामदेव हे दोघे डाळिंब व्यापारी होते. नेहमीप्रमाणे ते सांगलीत डाळिंब विक्री करून मालवाहतूक टेम्पोतून (एमएच 12 आरएन 6903) गावी कोळे येथे परतत होते. याचवेळी जितेंद्र मोरे हे आई, वडिलांच्या उपचारासाठी सांगलीस निघाले होते. योगेवाडी येथील साळुंखे मळ्याजवळ जितेंद्र मोरे यांच्या मोटारीने (एमएच 01 व्हीए 9512) सरगर यांच्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो रस्त्याकडेला उलटला. टेम्पोतील सोपान सरगर यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेले नामदेव सरगर यांना तातडीने सांगली-मिरज रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातात जितेंद्र मोरे, यांच्यासह त्यांची आई रंजना व वडील रमेश हेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली-मिरज रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. याप्रकरणी मृत सोपान यांचे भाऊ नामदेव मारुती सरगर (वय 28, रा. कोळे) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
ग्रामस्थांचे मदतकार्य...
अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोटारीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांचे पथक अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.