Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कुणबी दाखल्यांसाठी अशी हवीत कागदपत्रे'; ऑनलाइन सुविधा; वंशावळ, जुन्या नोंदीचा सरकारी दाखला गरजेचा, नेमकी काय प्रक्रिया..

'कुणबी दाखल्यांसाठी अशी हवीत कागदपत्रे'; ऑनलाइन सुविधा; वंशावळ, जुन्या नोंदीचा सरकारी दाखला गरजेचा, नेमकी काय प्रक्रिया..
 

सातारा : राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हे प्रमाणपत्र कसे काढायचे, असा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाज बांधवांना पडला आहे. त्यासाठी शासन निर्णयात काही निकष दिले आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा करण्यात आली आहे. अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला, वंशावळ, कुणबी नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीशी संबंधित जुना उतारा या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयात काही निकष दिले आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. सातारा गॅझेटमधील पुराव्यांच्या आधारे अहवाल सादर करण्यात आला आहे. आता त्याबाबतचाही शासन निर्णय निघणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे यापूर्वी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना दाखले मिळणे सोपे झाले आहे. केवळ त्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता अर्जासोबत करावी लागणार आहे.

असा करावा अर्ज
कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करण्यासाठी आपलं सरकार पोर्टलवर aaplesarkar.mahaonline.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची पीडीएफ स्वरूपातील प्रिंट काढून त्यासोबत कागदपत्रे जोडावी लागणार आहे. हा अर्ज तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जमा करायचे आहेत.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र

जमिनीबाबत जुने रेकॉर्ड, सातबारा व आठ अ उतारा

कुणबी असल्याचा जुना सरकारी दाखला

वंशावळ, कुटुंबातील खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा यांची नोंद असलेले दस्तऐवज

कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला

घरातील कुटुंबप्रमुखाचे जुने जात प्रमाणपत्र

नेमकी काय होणार प्रक्रिया
अर्ज व पुराव्याची कागदपत्रे सेतू केंद्रात दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी होईल. तहसील कार्यालयातून ही चौकशी मंडलाधिकाऱ्यांमार्फत होते. माहितीची पडताळणी झाल्यानंतर याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होते. दिलेल्या माहितीत त्रुटी असल्यास तसा अर्ज करणाऱ्याला दूर कराव्या लागतील किंवा त्याचे योग्य स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.