चेन्नईतील एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या मुलीला लंडनला पाठवण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण यशस्वी होताच ती त्यांना सोडून गेली. हे जोडपे आता लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून जीवन जगत आहे. आपल्या देशातील अनेक तरुणांना अमेरिका
आणि युरोपमध्ये जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. यासाठी
ते खूप चांगला अभ्यास करतात, शिक्षण घेतात आणि परदेशात नोकरीची संधी
मिळवतात. पण काही वेळा परदेशात गेल्यानंतर मुले आपल्या घराला आणि कुटुंबाला
विसरतात, अशी तक्रार अनेक पालक करताना दिसतात. त्यांनी मुलांसाठी खूप
मेहनत घेतलेली असते, पण विदेशात जाऊन मुलं त्यांना विसरून जातात, अशी
त्यांची खंत असते.
अशीच तक्रार करणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, जो पाहून खरंच डोळ्यांत पाणी येतं. या आजोबांनी आपल्या एकुलत्या एका मुलीला चांगल्या नोकरीसाठी लंडनमध्ये पाठवलं, पण ती तिथेच स्थायिक झाली आणि आता हे आजोबा लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून पोट भरत आहेत. हा व्हिडीओ @GanKanchi या एक्स (X) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चेन्नईमधील ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये मिठाई विकताना दिसतात. त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि तिला लंडनमध्ये नोकरीसाठी पाठवलं. पण लंडनमध्ये गेल्यावर तिने आपल्या आई-वडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही. त्यामुळे आता ते त्यांच्या ७० वर्षांच्या पत्नीसोबत कसेतरी दिवस काढत आहेत. आजी मिठाई बनवते आणि आजोबा ती ट्रेनमध्ये विकून जे काही पैसे मिळतात, त्यावर आपली गुजराण करत आहेत.(फोटो सौजन्य - @GanKanchi/X.com)हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. तो १३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत या वृद्ध जोडप्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. काही जण त्यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवत आहेत, तर काही त्यांच्या मुलीवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे, काही लोकांनी या वृद्ध जोडप्यावरही टीका केली आहे. त्यांनी आपल्या मुलीला योग्य संस्कार दिले असते तर ती कदाचित त्यांना सोडून गेली नसती, असं त्यांचं म्हणणं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.