गाडी नदीत फेकली, नंतर मरण्याची अॅक्टिंग! कोट्यवधींच्या कर्जापासून बचावासाठी भाजप नेत्याच्या मुलाचा फिल्मी ड्रामा
महाराष्ट्रात भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचून कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे हा थरार उघडकीस आला असून, संबंधित युवकाला शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात अटक करण्यात आली आहे.
कट कसा उलगडला?
5 सप्टेंबर रोजी पहाटे राजगढ पोलिसांना कालीसिंध नदीत कार कोसळल्याची माहिती मिळाली. तातडीने मदतकार्य सुरू करून गाडी बाहेर काढण्यात आली, पण आत कोणीही आढळले नाही. तपासात समोर आले की, ती कार भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी याची आहे. तो त्याच वेळी बेपत्ता असल्याने अपघातात बळी गेला असावा, असा सुरुवातीला अंदाज वर्तवला गेला. दहा दिवसांच्या शोधानंतरही मृतदेह हाती लागला नाही. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. त्यातच कुटुंबीयांनीही शोधमोहीमेत विशेष सहकार्य न केल्याच्या चर्चेला उधाण आले. पोलिसांनी मग तपासाचा फोकस तांत्रिक पुराव्यांवर नेला.
मोबाईल लोकेशनने गुपित उलगडलं
विशालच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सच्या तपासातून पोलिसांना मोठा धक्का बसला. त्याचे लोकेशन महाराष्ट्रात असल्याचे समोर आले. अखेर संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलिसांच्या मदतीने विशालला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने कबुली दिली की, 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त कर्जाच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी त्याने मृत्यूचा बनाव रचला. त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहने होती, मात्र आर्थिक अडचणींमुळे तो हवालदिल झाला होता. कुटुंबीयांपैकी काहींनी ‘मृत्यूचे प्रमाणपत्र मिळाले तर कर्ज माफ होईल’ असा सल्ला दिला होता. यावरूनच त्याने हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले.
अपघाताचा नाट्यपूर्ण प्रकार
विशालने कबुल केल्याप्रमाणे, 5 सप्टेंबरला पहाटे त्याने स्वतःची कार नदीकाठी नेली. गाडी चालू ठेवून, हेडलाईट बंद करून कारला नदीत ढकलले. त्यानंतर एका ड्रायव्हरच्या बाईकवरून परत ढाब्यावर आला आणि इंदूरकडे रवाना झाला. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या मृत्यूबाबतची बातमी वृत्तपत्रांत पाहून तो थेट महाराष्ट्रात पळाला. काही दिवस शिर्डी आणि शनी शिंगणापूर भागात लपून राहत होता.
अपहरणाची नवी कथा आणि पोलिसांची कारवाई
पोलिसांची नजर चुकवण्यासाठी विशालने आणखी एक डाव रचला. स्वतःचे कपडे फाडले, अंगावर माती धुळ घातली. अपहरण झाल्याची बनावट तक्रार फर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, आधीच सगळा तपास पूर्ण झाल्याने काही क्षणांतच पोलिसांनी त्याचा नवा बनाव फोडला. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, इतक्या मोठ्या गुन्हेगारी कटानंतर आणि पोलिस यंत्रणेला चुकीच्या दिशेने वळवूनही, विशाल सोनीवर अजूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.