पुणे :- शहरासह ग्रामीण भागातील मद्यविक्रीच्या दुकानांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. या दुकानांसमोरील बेशिस्त पार्किंग आणि इतर गैरप्रकारांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी थेट नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या. या तक्रारींची दखल घेत, पवार यांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, नियम मोडल्यास आणि शाळांजवळ दुकाने आढळल्यास परवाने रद्द करण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.शहर तसेच ग्रामीण भागात काही मद्यविक्री दुकानांच्या बाहेर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मद्यविक्री दुकानांच्या बाहेर हातगाड्या लावल्या जातात. त्यामुळे तिथे गर्दी होते. वेडीवाकडी वाहने लावणे, गाडीतच दारू पिण्यास बसणे, यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. काही वेळा भांडणाचे प्रकार घडतात. पवार
यांनी नुकत्याच हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेठी
घेतल्या. या वेळी नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी सांगितल्यानंतर
उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट सूचना देऊन पाहा, नाही ऐकले तर परवाने रद्द
करू असे आदेशच उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.उपमुख्यमंत्री पवार यांच्या
कारवाईच्या इशाऱ्यानुसार पोलीस, पालिका, तसेच उत्पादन शुल्क विभाग अशा
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे
लक्ष लागले आहे.
मद्यविक्री व्यावसायिकांत खळबळ..
उत्पादन शुल्क खाते आपल्याकडेच असल्याचा उल्लेख करत, उपमुख्यमंत्री पवार यांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. ज्या मद्यविक्रीच्या दुकानांचे परवाने शाळांच्या ठराविक अंतराच्या आत आहेत, अशा दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले. या इशाऱ्यामुळे मद्यविक्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वाहतूक आणि सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.