शाळेतील सोयीसुविधा किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी नव्हे, तर आपल्या आवडत्या मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. गावकऱ्यांनीही या आंदोलनात मुलांच्या सोबत येऊन थेट शाळाच बंद ठेवली आहे.
काय आहे प्रकरण?
सिद्धेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात वर्षांपासून विष्णू ओमासे हे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून शाळेचा चेहरामोहरा बदलला असून, 'स्वच्छ सुंदर शाळा' या योजनेत या शाळेने 24 लाख रुपयांचे मोठे बक्षीसही मिळवले आहे. शिक्षणासोबतच आवश्यक सोयीसुविधांसाठीही ओमासे गुरुजींनी मोठे कष्ट घेतले. यामुळेच विद्यार्थी आणि गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आणि जिव्हाळा आहे. शिक्षण विभागाने त्यांची बदली केल्याचे कळताच विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आणि त्यांनी ही बदली रद्द करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.
राजकीय नेत्यांनीही घेतली दखल
या आंदोलनाची दखल जनसुराज्य शक्ती पक्षाने घेतली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून या आदर्श मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
आता मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
मुख्याध्यापकांसाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.