विदर्भ - मराठवाडा नको रे बाबा! पुणे-मुंबईत कारकून ही होवू... बदली झालेल्या काही उपजिल्हाधिकाऱ्यांची अजब शक्कल
लोणी काळभोर: मुख्यमंत्र्यांच्या ,महसूल मंत्रांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावत बदली ठिकाणी न जाता कोणी मंत्री खासगी सचिव, विशेष कार्यधिकारी म्हणून घेईल का ? भले त्यासाठी कारकूनाचे पद उन्नत करून घेतले तरी चालेल पण आम्हाला मंत्री अस्थापनेवर घ्याच अशी शक्कल विदर्भ ,मराठवाड्यात बदली झालेल्या काही माहीर उपजिल्हाधिकार्यांनी लढवली आहे.
महसूल व वनविभागाने राज्यातील जवळपास दीड डझन उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रदीर्घ काळापासून प्रतिनियुक्तीवर ठाण मांडलेल्या, पुणे आणि मुंबईत वर्षानुवर्ष काम केलेल्यांच्या बदल्या खानदेश मराठवाडा आणि विदर्भात केल्या आहेत, मात्र यातील काही माहीर उपजिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच त्या भागात जावे लागू नये यासाठी मंत्री अथवा राज्यमंत्री यांच्याकडे खासगी सचिव अथवा विशेष कार्यधिकारी होता येते का यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी मंत्र्यांच्या जवळच्या लोकांना हाताशी धरून लगेच मागच्या तारखेचे पत्र तयार करून ते सामान्य प्रशासन विभागाला देण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी खासगी सचिव अथवा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या जागा रिक्त नसल्याने या अधिकाऱ्यांनी अशी शक्कल लढवली आहे की मंत्री आस्थापनेवरील कारकून, टंकलेखक ही पदे उपजिल्हाधिकारी संवर्गात परावर्तित करून अथवा वर्ग करून त्या जागेवर काम करण्याची तयारी देखील दाखवलेली आहे.प्रशासनातील महत्त्वाचे पद असलेले उपजिल्हाधिकारी हे पुणे मुंबई सोडून विदर्भ मराठवाड्यात जाऊ लागू नये म्हणून कारकून टंकलेखकाच्या परावर्तित पदावर देखील काम करायला मंत्री अस्थापनेवर तयार झालेले आहेत यावरूनच त्यांचा पुणे मुंबईवरील जीव लक्षात येतो. एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला असताना क्षेत्रीय पातळीवर महसुली विभागात प्रचंड रिक्त पदे असल्याने नियमित कामकाज, शेतीचे पंचनामे, भूसंपादन असे अनेक विकासात्मक कामकाज ठप्प झालेले असताना वर्षानुवर्ष पुणे आणि मुंबईमध्ये काम करण्यास सोकावलेले अधिकारी विदर्भ, मराठवाड्यात जायला तयार नाहीत याबाबत सरकारने कडक कारवाई करण्याची गरज आहे,नाहीतर 'नेहमीची येतो पावसाळा' याप्रमाणे थोड्या दिवसात याच अधिकाऱ्यांचे सुधारित आदेश पुणे-मुंबई विभागात अथवा मंत्री आस्थापना वर झाल्यास काहीच बदललेले नाही असेच लोकांना वाटेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.