Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हाधिकाऱ्यांची मुले शिक्षणासाठी अंगणवाडीत.इंग्रजी शाळांच्या प्रेमात पडलेल्यांना धडा

जिल्हाधिकाऱ्यांची मुले शिक्षणासाठी अंगणवाडीत.इंग्रजी शाळांच्या प्रेमात पडलेल्यांना धडा
 

नंदुरबार : कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात कूप्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमध्ये अंगणवाडीमधून मिळणारी सेवाही तोकडीच. तरीही अंगणवाडीमधून लहान मुलांचे योग्य पालन पोषण करुन त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो. अंगणवाड्यांची स्थिती माहिती असतानाही आणि शहरात अनेक उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतानाही अंगणवाडीतच जर जिल्हाधिकाऱ्यांची मुले प्रवेश घेत असतील तर…?

होय, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांना टोकरतलाव या गावातील अंगणवाडीत प्रवेशित केले आहे. वयाचा तिसरा वाढदिवस साजरा करणाऱ्या शुकर आणि सबर यांच्या अंगणवाडी प्रवेशाने आता अंगणवाडीत आपोआपच दर्जेदार सेवा मिळेल, या माफक अपेक्षेने इतर पालकही अधिक आनंदित झाले आहेत. नंदुरबारपासून तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव येथील अंगणवाडीत शुकर आणि सबर या तीन वर्षांच्या सेठी भावांचा प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा ठरला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि त्यांचे पती डॉ. वैभव सबनीस यांनी सामाजिक दायित्वाचे भान जोपासत आपल्या जुळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेशित केले आहे. सोमवारी शुकर आणि सबर यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने दोघांना घेवून जिल्हाधिकारी टोकरतलावच्या अंगणवाडीत गेल्या होत्या.

टोकर तलावच्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांनी खासगी शिंपीच्या मदतीने नाविन्यपूर्ण झोळी बनवली आहे. या अंगणवाडीमधील मूल झोळीत बसल्यानंतर रडत नसल्याचे दिसून आले आहे. या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांची इतर मुलांना मिळणारी प्रेमाची वागणूक पाहून या अंगणवाडीत मुलांना प्रवेशित करण्याची इच्छा झाल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी यांनी सांगितले. अंगणवाडी चांगल्या दर्जाची असल्याने इथे मुलांना प्रवेशित केल्याचा आनंद झाला आहे.

परिसरात शाळा आणि अंगणवाडी एकाच आवारात असल्याने याठिकाणी मुलांना सोडण्यास गेल्यानंतर शाळेवरही लक्ष राहील. शिवाय जर माझी मुले अंगणवाडीत गेल्यानंतर इथे काही सुधारणा होणार असेल तर तशी योजना जिल्हाभरातील अंगणवाडीमध्ये लागू करण्याची संधी असल्यानेच मुलांना टोकरतलावच्या अंगणवाडीत प्रवेशित केल्याचे डॉ. मित्ताली सेठी यांनी लोकसत्ताला सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडींमधून कुपोषण कमी करण्याची मोठी जबाबदारी असतांना याठिकाणी फक्त माल आणि साहित्य पुरविण्याच्या ठेक्यातच यंत्रणेला रस असल्याचे देखील अनेक वेळेस उघड झाले आहे. त्यामुळेच आता थेट जिल्हाधिकारी यांची मुलेच जर अंगणवाडीमध्ये दाखल झाली असतील तर याठिकाणी दर्जेदार सुविधा देण्याकडे महिला आणि बालकल्याण विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांनिमित्त इतर मुलांचे देखील भले होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून मुलांना अंगणवाडीत दाखल करण्याच्या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.