Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाप-लेकाच्या मनोमिलनाने न्यायाधीशही गहिवरले'; कऱ्हाडला लोकन्यायालयात सव्वासहा कोटींची तडजोड; रक्ताचे ऋणानुबंधही जुळले

बाप-लेकाच्या मनोमिलनाने न्यायाधीशही गहिवरले'; कऱ्हाडला लोकन्यायालयात सव्वासहा कोटींची तडजोड; रक्ताचे ऋणानुबंधही जुळले
 

कऱ्हाड : चार वर्षांपासून एकमेकाचे तोंडही न पाहणारे बाप-लेक लोकन्यायालयाच्या निमित्ताने एकत्र आले. दोघांतील कटुता संपवून एकमेकाला घट्ट मिठी मारली, मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले, तर वडिलांनीही चूक झाल्याचे सांगून मुलाची समजूत काढली. हे मनोमिलन पाहून न्यायालयाचे डोळेही पाणावले. चार वर्षांचा दुरावा एका लोकन्यायालयात संपुष्टात आला. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या फौजदारी आणि दिवाणी खटले एका मिनिटात काढून दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. ही घटना आहे कऱ्हाडच्या लोकन्यायालयातील!

जाधववाडी (ता. पाटण) येथील सुदाम वेंकट जाधव आणि त्यांचा मुलगा राजेश सुदाम जाधव यांच्यातील नातेसंबंध अत्यंत टोकाला गेले होते. दोघांनी एकमेकांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते. धनादेश अनादरचा खटलाही प्रलंबित होता. एकमेकांना पाण्यात पाहणारे बाप-लेकांमध्ये न्यायाधीश आणि पक्षकारांचे विधिज्ञ आर. पी. गांधी, ओमकार पाटील व दीपक पवार यांनी सलोखा घडवून आणला. त्यामुळे रक्ताचे नाते पुन्हा एकत्र आले. येथे झालेल्या लोकन्यायालयात तब्बल सहा कोटी १८ लाखांच्या तडजोडीसह काही भावनिक नाती ही पुन्हा एकत्र आली. झाले गेले पाठीवर टाकून यापुढे गुण्यागोविंदानेपान राहण्याच्या अनाभाका घेतल्या गेल्या. यापुढे न्यायालयाची पायरी चढायची नाही, असा निर्धार काही जणांनी केला.

येथील न्यायालयात सद्यःस्थितीत एकूण १८ हजार ६१० खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी तीन हजार ३१० केसेस लोकन्यायालयात ठेवल्या होत्या. त्यापैकी तब्बल ४९६ केसेस सामंजस्यांनी मिटल्या. वादपूर्व निकाली केसेस जवळपास २०० न्यायालयात येण्यापूर्वीच मिटवल्या गेल्या. त्यामुळे लोकन्यायालयात ६९६ केसेस सामंजस्याने मिटल्या गेल्या.

येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी, दिलीप भा. पतंगे यांच्या नेतृत्वाखाली येथे लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. यातध्ये अपघात प्राधिकरण, धनादेश अनादर, तडजोडीपात्र खटले आणि दावे या प्रकरणांचा लोकन्यायालयात समावेश केला होता. कऱ्हाड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात आणि सर्व वकील सदस्यांनी लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

न्यायाधीश पॅनेलमध्ये एका वकील सदस्याचा सहभाग नोंदवला होता. लोकन्यायालयात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. तोडकर, एस. डी. कुरेकर, पी. एल. घुले, के. आर. खोंद्रे, जे. जे. माने, दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोमिडवार, पी. एस. भोसले, ए. बी. मोहिते, पी. पी. कुलकर्णी, अतुल ए उत्पात हे विधी अधिकारी पॅनेल प्रमुख म्हणून कार्यरत होते. लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी वकिलांसह न्यायालयीन अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी, पक्षकारांनी योगदान दिले.

अध्यक्ष झाल्यापासून दुसऱ्या लोकअदालतीत मोठ्या प्रमाणात यश आले. ३३१० केसेसपैकी ६९६ केसेस निकाली निघाल्या. हा आजपर्यंतचा विक्रम आहे. सहा कोटी १८ लाख ३२ हजार २८१ रुपये रकमेची वसुली झाली. लोकअदालत पूर्णतः यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हा न्यायाधीश, तालुका न्यायाधीश, लोकअदालतीमध्ये सहभागी झालेले वकील, पक्षकार, सर्व लिपिक, स्टाफ यांचे धन्यवाद.

- ॲड. दीपक थोरात, अध्यक्ष, कऱ्हाड तालुका वकील संघटना

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.