तुम्ही डिजिटल वॉलेट मोबिक्विक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वात आधी तुमच्या वॉलेटमध्ये तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? ते तपासा. कारण, लाखो ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरले गेले आहेत. ११ आणि १२ सप्टेंबर रोजी कंपनीच्या सिस्टीममधील एका तांत्रिक बिघाडाचा फायदा घेऊन ४० कोटी रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे यूजर्सना त्यांच्या वॉलेटमधील शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता आले. विशेष म्हणजे, चुकीचा पिन नंबर टाकूनही व्यवहार पूर्ण झाले.
१३ सप्टेंबर रोजी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब आल्यावर या घोटाळ्याचा खुलासा झाला. तपासानंतर असे समोर आले की, या ४८ तासांत जवळपास ५ लाख संशयास्पद व्यवहार झाले आणि त्यातून ४०.२ कोटी रुपयांची हेराफेरी झाली. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे २५०० बँक खाती ओळखली असून, त्यातील ८ कोटी रुपयांची खाती गोठवण्यात आली आहेत.
६ जणांना अटक, कंपनीचा कर्मचारीही संशयाच्या फेऱ्यात
या प्रकरणी पोलिसांनी नूंह आणि पलवल भागातून सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या खात्यांमधून ९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींची नावे रेहान, वकार युनूस, वसीम अकरम, मोहम्मद आमिर, मोहम्मद अंसार आणि मोहम्मद साकिल अशी आहेत. या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची या फसवणुकीत मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
२६ कोटी रुपयांचे नुकसान, नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मोबिक्विकच्या प्रवक्त्याने सांगितले की, या फसवणुकीतून आतापर्यंत १४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, ज्यामुळे कंपनीला झालेले निव्वळ नुकसान २६ कोटी रुपये आहे. कंपनी ही उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहे. नूंह पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ११ किंवा १२ सप्टेंबर रोजी जर चुकून कुणाच्या खात्यात विनाकारण पैसे जमा झाले असतील, तर त्यांनी २३ सप्टेंबरपर्यंत नूंहच्या एसपी कार्यालयात किंवा संबंधित पोलीसस्टेशनला माहिती द्या ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मोबिक्विकला अशा प्रकारच्या मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्येही कंपनीसोबत १९ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. आता सॉफ्टवेअर अपडेटनंतर ही तांत्रिक त्रुटी समोर आली आहे, ज्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.