लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने होणाऱ्या पतीनेच तरुणीची हत्या केली आहे. घरात एकटी असताना आधी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पालघरमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास मृतक तरुणीचे आई-वडील हे शेतात गेले होते. त्यावेळी तिचा होणारा पती घरी आला. ही तरुणी घरी एकटीच असल्याचं पाहून त्याने तिला शारीरिक संबध ठेवण्यास सांगितले. मात्र, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिला.
आपल्या होणाऱ्या पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपी तरुण चांगलाच संतापला. यानंतर त्याने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या तरुणीच्या गावाजवळ असलेल्या जंगलात आरोपी पळून गेला. संध्याकाळच्या सुमारास या तरुणीचे आई-वडील घरी परतले तेव्हा घरात शिरताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. घरात आपली मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांना एक मोठा धक्का बसला. यानंतर मृतक मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतक मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या होणाऱ्या पतीवर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण गावातून होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.