सांगलीत खळबळ! 'गणेश विसर्जनासाठी निघालेल्या दोघींचा विनयभंग, चाकूहल्ला'; रात्री सव्वाअकराच्या सुमारास घटना..
सांगली: शहरातील बापट बाल शाळेजवळ घरगुती गणपती विसर्जनासाठी निघालेल्या महिला व तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर संशयिताने चाकूहल्ला चढवत दोघांना गंभीर जखमी केले. काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलिसातं फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत
बारा तासांत दोघांना जेरबंद केले. सौरभ उर्फ राकेश सदाशिव वाघमारे (वय २३,
शाहूनगर, सांगली) आणि ओंकार संभाजी केंगार (वय २३, शामरावनगर) अशी त्यांची
नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही पती, मामा, मामेभाऊ यांच्यासह इतर नातेवाइकांसमवेत काल रात्री गणपती विसर्जनासाठी निघाली होती. रात्री सव्वा अकराच्या सुमारास सर्वजण शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या शाळेजवळ आले. यावेळी पीडित महिला आणि एक तरुणी गाड्याच्या मागून चालत निघाल्या होत्या.यावेळी दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी दोघींचा विनयभंग केला. पीडिता ओरडल्या असता कुटुंबीयांनी त्या दुचाकीस्वारांना अडवून जाब विचारला. दोघांनी दुचाकीवरून उतरून पीडितेचा पती, मामेभावाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पीडिता या भांडणे सोडवण्यासाठी गेल्या असता एकाने त्याच्याजवळील चाकूने पतीच्या पाठ, मानेवर वार केला. पीडितेच्या मामेभावावर संशयितांनी चाकूने वार केले.वार वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी नागरिक धावत आल्याने दोघांनी दुचाकीवरून पळ काढला. जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संशयितांचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संदीप पाटील, विशाल कोळी, संतोष गळवे यांनी दोघांना बारा तासात जेरबंद केले. उपनिरीक्षक केशव रणदिवे तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.