सांगली :-'कर्णकर्कश ध्वनियंत्रणांना पोलिसांचा दणका'; ३७ मंडळांवर कारवाई; उपाधीक्षक विमला एम. यांची धडक मोहीम
सांगली: गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजाच्या ध्वनियंत्रणेबाबात पोलिसांनी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. मात्र, काही मंडळांनी हरताळ फासत कर्णकर्कश आवाजाची यंत्रणा मिरवणुकीत वापरल्याचे दिसले. त्यानंतर पोलिस उपाधीक्षक विमला एम. यांनी धडक मोहीम घेत चार पोलिस ठाण्यांच्या हद्दतील ३७ मंडळांवर कारवाईचा बडगा उगला. पहिल्यांदा खटला पाठवण्यात आला असून दुसऱ्यांदा आढळल्यास ध्वनियंत्रणा जप्त केली जाईल, असा थेट इशारा विमला एम. यांनी दिला आहे.
यंदाचा गणेशोत्सव ध्वनियंत्रणा आणि नशामुक्त साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला फाटा दिल्याचे पाहावयास मिळाले. पाचव्या आणि सातव्या दिवशी सांगली शहरासह ग्रामीण भागातही कर्कश ध्वनियंत्रणेचा दणदणाट करण्यात आला. त्यामुळे सांगली शहर पोलिस ठाण्यात ७, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात ११, विश्रामबाग पोलिस ठाण्यात १२ आणि संजयनगर पोलिस ठाण्यात ७ असे ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशी दिवशी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. परंतु त्या दिवशीही दणदणाट दिसून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा विमला एम. यांनी दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय ध्वनिक्षेपक मापक यंत्राची नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.