Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- आयकर अधिकाऱ्यांचा बनाव करून एक कोटीचा ऐवज लुटणारी टोळी जेरबंद

सांगली :- आयकर अधिकाऱ्यांचा बनाव करून एक कोटीचा ऐवज लुटणारी टोळी जेरबंद
 

सांगली : कवठेमहांकाळ येथे डॉक्टरांच्या घरी मुंबईतील आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत चौघांनी छापा टाकला होता. या टोळीने 85 लाखहून किमतीचे दागिने व 15 लाखांची रोकड लुटली होती. या प्रकरणाचा 60 तासात छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतून महिलेसह तिघांना अटक केली, तर चौघांनी पलायन केले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोने आणि रोकड असा एक कोटी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलिस अधीक्षक सचिन थोरबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतिराम पाटील आदी उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीक्षा राष्ट्रपाल भोसे (वय 25, रा. काकाडे पार्क, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (25, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), साई दीपक मोहिते (23, रा. पाचगाव, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे, तर महेश रघुनाथ शिंदे (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), अक्षय लोहार (रा. संकेश्वर, जि. बेळगाव), शकील पटेल (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) व आदित्य मोरे (रा. रुकडी, जि. कोल्हापूर) हे पसार झाले आहेत. त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत. 


कवठेमहांकाळ येथे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. याच रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. रविवार दि. 14 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चौघांनी, 'पेशंट आणले आहे. डॉक्टरही आमच्या परिचयाचेच आहेत,' अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला. सुरक्षा रक्षक डॉक्टर म्हेत्रे यांना बोलाविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर चौघेही त्यांच्या पाठोपाठ वर गेले. त्यानंतर 'आम्ही मुंबई आयकर विभागातून आहोत, तुमच्या घराची झडती घ्यायची आहे', असे सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकासह डॉक्टरांच्या कुटुंबातील सर्वांचे मोबाईल त्यांनी काढून घेतले. तोतया अधिकार्‍यांनी डॉ. म्हेत्रे यांचे घर धुंडाळून एक किलो 410 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 15 लाख 60 हजार रुपयांची रोकड घेऊन पलायन केले होते. जाताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये यासाठी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे जप्तीची नोटीसही दिली होती. डॉक्टरांनी या छाप्याबाबत चौकशी केली असता, हा छापा बोगस असल्याचे समोर आले होते.

घटना समजल्यानंतर सांगली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. संशयितांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डिव्हीआरही काढून नेला होता. परंतु गावातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मात्र एक कार आढळून आली होती. या कारच्या आधारेच या प्रकाराचा भांडाफोड करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील सर्व तोतया आयकर अधिकारी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यापैकी दीक्षा भोसले, महेश शिंदे, अक्षय लोहार आणि शकील पटेल या चौघांनी डॉ. म्हेत्रे यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी काही दिवसांपासून रेकी केली होती व रविवारचा दिवस त्यांनी हेरला होता. यासाठी सांगलीत हे सर्वजण एकत्र आले. एका रिक्षा चालकाच्या मदतीने त्यांनी भाड्याने कार घेतली. या कारमधून त्यांनी कवठेमहांकाळ गाठले. बोगस छापा टाकल्यानंतरही त्यांनी याच कारमधून सांगोला (जि. सोलापूर) कडे पलायन केले. चोरीतील सोने आणि रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी पार्थ व साई उपस्थित होते. दोघांकडे सर्व मुद्देमाल देऊन छाप्यातील चौघा संशयितांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी कार तेथेच सोडून एसटी बसने आपापल्या गावी पलायन केले होते.

याचा छडा लावण्यासाठी सांगली पोलिसांकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत होत्या. यापूर्वी अशा प्रकारचे छापे कोठे कोठे पडले होते, त्यातील आरोपी काय करतात याचाही शोध घेण्यात येत होता. दरम्यान, या गुन्ह्यातील महिला पुण्यातील चिंचवड येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून दीक्षा भोसले हिला ताब्यात घेतले. तिने अन्य साथीदारांच्या मदतीनेच हा बोगस छापा टाकल्याची कबुली दिली. यावेळी चौकशी केली असता, चौघांनी बोगस अधिकारी बनून छापा टाकून त्यातील रक्कम आणि सोने हे यांच्याकडे दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पार्थ व साई या दोघांना हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून चोरीस गेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले. परंतु दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मात्र अन्य चौघांनी पलायन केले आहे. त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक पंकज पवार, सहायक निरीक्षक नितीन सावंत, दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक तेजश्री बोबडे, हवालदार सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, संदीप नलावडे, संदीप गुरव यांनी सहभाग घेतला.

 
मुख्य सूत्रधार अद्याप फरार

महेश शिंदे आणि पार्थ मोहिते या दोघांनी हा कट रचला होता. या छाप्याची मूळ संकल्पना महेश याची होती. त्याने पार्थसह अन्य साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. परंतु सूत्रधारांपैकी पार्थ हा पोलिसांच्या गळाला लागला आहे, तर मुख्य सूत्रधार महेश मात्र अद्याप मोकाट असून त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

मटकाबहाद्दर ते 'स्पेशल 26'चा मुख्य सूत्रधार

महेश शिंदे याच्यावर यापूर्वी जुगाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. महेश वगळता इतर कोणत्याही संशयितावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. त्यांचा हा पहिलाच प्रकार असल्याचेही तपासात आता समोर आले आहे.

विमान कंपनीची कर्मचारी ते तोतया आयकर अधिकारी
दीक्षा भोसले ही एका नामांकित विमान कंपनीमध्ये काम करीत होती. विमानतळावर तिची नियुक्ती होती. पार्थ याची ती मैत्रीण असून त्याच्या सांगण्यावरून तिने या कटात सहभाग घेतला होता. 'स्पेशल 26'मध्ये दाखविण्यात आलेल्या अधिकार्‍याच्या थाटाप्रमाणे तिने या छाप्यात वावर केला होता.
डॉक्टरांना दिलेली जप्ती नोटीस इंग्रजीत

छाप्यानंतर डॉ. म्हेत्रे यांना दिलेली मुद्देमाल जप्ती नोटीस ही महेश याने लिहिली होती. ही संपूर्ण नोटीस त्याने इंग्रजीत लिहिली होती. त्यामध्ये एकही स्पेलिंग मिस्टेक आढळून आली नव्हती. तसेच संपूर्ण नोटीस ही इंग्रजीत रनिंग लिपीमध्ये लिहिण्यात आली होती. दरम्यान, पोलिस सूत्रांनी गुन्ह्यासाठीची कार्यपद्धती आणि चित्रपट कथानकातील साम्य गप्पांच्या ओघात, चर्चेत मान्य केले. 'स्पेशल 26, रेड, रेड टू' यांसारख्या चित्रपटांचा प्रभाव संशयितांवर असू शकतो, अशी मोठी शक्यता व्यक्त होत आहे. हे चित्रपट खूप लोकप्रिय झालेले आहेत आणि संशयित शिकलेले आहेत, असे मतही सूत्रांनी व्यक्त केले.

सर्व संशयित उच्चशिक्षित
मुख्य सूत्रधार महेश शिंदे हा इंजिनिअर आहे. पार्थ मोहिते हा मुंबईत एका खासगी बँकेत सोने तारण कर्जाचे काम करतो. साई मोहिते याची कोल्हापुरात इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. तसेच पसार झालेले संशयितही उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.