भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांचा एकप्रकारे मोठा फटका भाडेकरुंना बसणार आहे. जर तुम्ही भाडेकरु असाल आणि पेटीएम, फोनपे च्या माध्यमातून क्रेडिट कार्डने घरभाडे देत असाल तर आता विसरा...असेच म्हणावे लागेल. क्रेडिट कार्डने घरभाडे फोनपे, पेटीएमद्वारे देणाऱ्यांसाठी आता मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कारण या कंपन्यांची भाडे पेमेंट सेवा बंद करण्यात आली आहे.
आरबीआयच्या नियमांमुळे 'ब्रेक'
गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डने घरभाडे भरणे खूप लोकप्रिय झाले होते. यामुळे युझर्सना क्रेडिट पॉइंट आणि व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा फायदा मिळत होता. परंतु, १५ सप्टेंबर रोजी आरबीआयने 'पेमेंट ॲग्रीगेटर्स' साठी नवीन आणि कठोर नियम जारी केले.
काय आहेत RBI चे नवीन नियम?
'गुडरिटर्न'ने 'मनीकंट्रोल'च्या रिपोर्टनुसार, वृत्त दिले. यात आरबीआयने पेमेंट ॲग्रीगेटर्सना 'मार्केटप्लेस' म्हणून काम करण्यापासून रोखले आहे. याचा अर्थ असा की, हे ॲप्स आता अशा घरमालकांना पैसे पाठवू शकत नाहीत, जे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे व्यापारी म्हणून नोंदणीकृत नाहीत आणि ज्यांचे KYC व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले नाही. या नियमांमुळेच फिनटेक कंपन्यांना ही सेवा बंद करावी लागली आहे, असे म्हटले आहे.
आता भाडे कसे भरावे लागणार?
आतापर्यंत हे ॲप्स KYC नसलेल्या घरमालकांसाठी एक मध्यस्थ म्हणून काम करत होते, ज्यामुळे क्रेडिट कार्डने भाडे भरणे शक्य होत होते. परंतु, आता ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, युझर्सना जुन्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल. थेट घरमालकाच्या बँक खात्यात ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे, चेक देऊन भाडे भरणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जर तुम्ही कॅशही देऊ शकत असाल तर ती सुद्धा सोय असू शकते.
कोणाला जास्त फटका बसेल?
आरबीआयच्या या नव्या नियमांचा सर्वाधिक फटका अशा लोकांना बसेल, जे क्रेडिट कार्डने भाडे भरून रिवॉर्ड पॉइंट मिळवत होते किंवा व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा लाभ घेत होते. आता त्यांना हे फायदे मिळणार नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.