Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नळाला पाणी आलं, मोटार लावायला गेल्या अन् जोराचा आवाज... घरातच विवाहितेचा हादरवणारा अंत

नळाला पाणी आलं, मोटार लावायला गेल्या अन् जोराचा आवाज... घरातच विवाहितेचा हादरवणारा अंत
 

छत्रपती संभाजीनगर: नळाला पाणी आल्यानंतर विद्युत मोटर लावत असताना विजेचा शॉक लागून 40 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना संभाजीनगरातील उस्मानपुरा भागातील त्रिशरण नगर येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चित्रा संदीप गायकवाड (वय 40 राहणार त्रिशरण नगर उस्मानपुरा) असं मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रा गायकवाड या कुटुंबासह उस्मानपुरा भागात राहतात. त्यांचे पती संदीप गायकवाड हे रेल्वे विभागात नोकरी करतात. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे.

दरम्यान, शहरात पाण्याची समस्या ही नेहमीचीच आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील आठ दिवसाआड पाणी येतं. यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांची नेहमीच धडपड होत असते. दरम्यान, शनिवारी उस्मानपुरा भागातला पाण्याचा पहिला टप्पा होता. नळाला पाणी आल्यामुळे चित्रा गायकवाड यांनी पाणी वाया जाऊ नये, पाणी मिळावं यासाठी काही गडबडीने विद्युत मोटर बाहेर काढत चालू केली. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. मोठा आवाज झाल्याने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली. 
 
त्यांनी जाऊन पाहिलं असता, चित्रा यांना विजेचा शॉक लागल्याचं दिसलं. नातेवाईकांनी तात्काळ चित्रा यांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी चित्रा यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. चित्रा गायकवाड यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.