कुख्यात आरोपी निलेश घायवळला देश सोडून पळून जाण्यात चंद्रकांत पाटलांची अप्रत्यक्ष साथ? रविंद्र धंगेकरांनी प्रसिद्ध केले फोटो
पुणे : शहरात आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु असताना गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ कारवाईच्या भीतीने देश सोडून पळून गेल्यानंतर एका गुन्हेगाराला पासपोर्ट कसा मिळतो? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्या व्यक्तीचे मोबाईल आणि नंबर चेक केले तर ती व्यक्ती किती वेळा घायवळ सोबत बोलली आणि त्याने किती वेळा चंद्रकांत पाटील यांना निरोप दिला याची सविस्तर माहिती मिळेल, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता.
या आरोपांनंतर माध्यमांनी चंद्रकांतदादांना याबाबत प्रश्न विचारले असता “I AM SORRY” म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं. यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच आता रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा घायवळ प्रकरणावर प्रतिक्रिया देत खळबळजन पुरावे सादर केले आहेत.पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील सध्या आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळ प्रकरणावर बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील याच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे. पुढं धंगेकर यांनी समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो माध्यमांना दाखवला आहे. यानंतर हा समीर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील व्यक्ती असून, त्याच्यावर गुन्हेगारी संबंध आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचे आरोप आहेत. तसेच, समीर पाटील चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा, पोलिसांना त्रास देणारा आहे, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदांमध्ये छेडछाड करण्याचं काम समीर पाटील करतो, असंही धंगेकरांनी म्हंटल आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.