Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर

सांगली :- यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर
 

सांगली : नाट्य क्षेत्रात मानाचे मानले जाणारे आद्यनाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्यक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या जेष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर करण्यात आले आहे. गौरवपदक, 25 हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराची घोषणा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी सांगलीत केली.

डॉ. कराळे म्हणाले, आमची संस्था 83 वर्ष नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर  रंगभूमीदिनाचे उचित्य साधून नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्याची परंपरा संस्थेने जोपासली आहे. यंदाचा 58 वा पुरस्कार आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते कुळकर्णी यांना दि. 5नोव्हेंबर  हे गौरव पदक देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा जन्म 1955 मध्ये झाला असून 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगच्या माध्यमातून त्यांचा कलात्मक प्रवास सुरू झाला. 
 
' गुंतता हृदय हे ' या मराठी नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या महान रंगकर्मीच्या मार्गदर्शनाखाली हिंदी प्रयोगशील नाटकात अभिनय केला. 1978 मध्ये डॉ. विजया मेहता यांनी त्यांना मराठी नाटक हमीदाबायची कोठी मध्ये शब्बोची  भूमिका दिली. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीशी एक दीर्घकालीन आणि समृद्ध नातं निर्माण केलं. त्यांनी महासागर, सावित्री, अकस्मात,  सर्वस्वी तुझीच, वटवट सावित्री, आईच घर उन्हाचं, देहभान, प्रेमपत्र आणि असेन मी नसेन मी यासारख्या नाटकांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी महासागराची पुनर्निर्मिती केली. डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि त्याची हिंदी आवृत्ती डॉक्टर आप भी यासारखी नाटके दिग्दर्शित केली. इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी एज्युकेटिंग रिटा,  महात्मा व्हर्सेस गांधी आणि वेडिंग  अल्बम यासारख्या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी चित्रपट निर्मिती ही केली आहे. अशा या बहुआयामी निना कुळकर्णी यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर मराठी पुरस्कार नाट्य दर्पण आणि नाट्य परिषद यासारख्या अनेक संस्थांनी सन्मान केलेला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.