पुणे - सोलापूर महामार्गावर वाहन अडवून थकबाकी वसुलीच्या नावाखाली पैसे लुटणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या टोळक्याने एका वकिलाला दमदाटी करून तब्बल 25 हजार रुपये लुटल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता.हवेली) चौकात घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी अॅड. मधुसुदन हिरा सदाफुले (वय 60, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. सदाफुले हे कुटुंबासह कामानिमित्त पुण्याकडे कारने येत होते. त्यांच्यासोबत मित्र मंगेश जमादार हेही प्रवास करत होते. लोणी स्टेशन चौकात आल्यानंतर बिगर नंबरप्लेटच्या दोन पांढर्या कार अचानक त्यांच्या गाडीसमोर आल्या व गाडी अडवली. त्या कारमधून उतरलेल्या सुमारे सात जणांनी आम्ही बँकेचे रिकव्हरी एजंट आहोत. तुमच्या गाडीवर थकबाकी आहे; आम्ही ही गाडी जप्त करत आहोत, असे सांगत वकिलाला दमदाटी केली. गाडीत महिलाही असल्याने त्यांना भीती वाटली. अॅड. सदाफुले यांनी त्यांना गाडी सोडण्याची विनंती केली असता, 25 हजार रुपये दिल्यास वाहन सोडतो, असे सांगण्यात आले. सदाफुले यांनी भीतीपोटी रोख 25 हजार रुपये दिल्यानंतर, त्यांनी पावती मागितली असता टोळक्याने पावती नाही असे सांगून घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा प्रयत्न सदाफुले यांच्यासोबत झाला होता. मात्र त्या वेळी त्यांनी कोणालाही पैसे दिले नसून यवत पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.