मध्य प्रदेशात कफ सिरप प्यायल्यानं १४ पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू झाला. तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डॉक्टर सोनी यांना अटक करण्यात आली आहे. आता या डॉक्टरच्या बचावासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आले आहे. प्रशासकीय आणि नियामक मंडळांच्या गंभीर
बेजबाबदारपणाचा हा परिणाम असल्याचं आयएमएने म्हटलंय. औषध लिहून देणाऱ्या
डॉक्टरना अटक हे कायद्याचं अज्ञान दाखवणारं उदाहरण आहे. पीडित कुटुंब आणि
डॉक्टर दोघांनाही नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने
दिलीय. आयएमएने म्हटलं की, मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे निर्माण झालेलं संकट
आणि ते कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरना अटक हे अधिकारी आणि पोलिसांना
कायद्याचं ज्ञान नसल्याचं दाखवणारं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खऱ्या दोषींवर
तात्काळ कारवाई करावी आणि पीडित कुटुंबिय आणि डॉक्टरांना योग्य ती नुकसान
भरपाई द्यावी.
देशात याआधीही अशा घटना घडल्या आहेत. डॉक्टरना माहिती नसतं की कोणतं सिरप विषारी आहे. जोपर्यंत याचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत तोवर त्यांनाही सांगता येत नाही. डॉक्टरांनी औषध लिहून दिलं यासाठी ते कसे जबाबदार? सरकारी रुग्णालयात जे कफ सिरप पुरवलं जातं तेच त्यांनी दिलं. ते विषारी आहे की चांगलं हे त्यांना माहिती नव्हतं असंही इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दिलीप भानुशाली म्हणाले.परासिया पोलीस ठाण्यात स्थानिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी श्रीसन फार्मास्युटिकल्स यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर श्रीसन फार्मास्युटिकल्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमओच्या रिपोर्टनंतर घाईगडबडीत डॉक्टरांना अटक केली गेली. नियामक मंडळ आणि संबंधित औषध कंपनीच्या चुकांवरून लोकांचं लक्ष हटवण्याचा हा प्रकार दिसून येत असल्याचंही आयएमएने म्हटलंय.इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं की, काही औषध कंपन्या खोकल्याचं सिरप बनवण्यासाठी महागड्या आणि सुरक्षित ग्लिसरन, प्रोपाइलिन ग्लायकोल ऐवजी स्वस्त, विषारी पदार्थांचा वापर करू शकतात. हे विषारी पदार्थ दिसायला सारखेच असतात. निर्मिती आणि नियामक पातळीवर गुणवत्ता तपासणीत चूक झाल्याच मुलांची किडनी निकामी होण्याचा किंवा जीव जाण्याचा धोका असतो अशी भीती आयएमएने व्यक्त केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.