Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झुंड चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा खून

झुंड चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा खून

नागपूर : दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची मध्यवर्ती भूमिका असलेला झुंड चित्रपट देशभर गाजला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भुमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला कुख्यात गुन्हेगार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा मंगळवारी रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला.

त्याच्याच मित्राने धारदार चाकूचे वार करीत आधी बाबू छत्रीचा गळा चिरला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या छत्रीवर दगडाने ठेचून त्याचा चेहराही विद्रूप केला.

जरिपटका पोलिस हद्दीतल्या नारा जवळच्या पडक्या निर्मनुष्य घरात मध्यरात्री दोनच्या सुमारास ही खुनाची थरारक घटना घडली.
गजानन नगरितल्या एका निर्माणाधिन इमारतीला लागून हे घर आहे. तिथेच बाबू आणि त्याचे नशेडी मित्र नेहमी दारू, गांजा आणि व्हाईटनरची नशा करत बसायचे.

रात्री दोनच्या सुमारास या पडिक घरात प्रियांशू आणि त्याचा दुसरा कुख्यात मित्र ध्रूव साहू या दोघांनी यथेच्छ मद्य प्राशन केले. दारूच्या नशेत कसल्यातरी कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा वाद विकोपाला गेल्यानंतर आधी बाबू छत्रीने आपल्याकडील चाकू काढला. त्याचा हा वार चुकवत ध्रुवने बाबूच्या हातातून चाकू हिसकावला आणि त्याच्याच चाकूने बाबूवर हल्ला चढवला. ध्रुवने बाबूच्या गळ्यावरही चाकूचा वार केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबूच्या डोक्यात दगड घालून ध्रुव घटनास्थळावरून पसार झाला. याची माहिती मिळताच सकाळी जरिपटका पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी धावले. अवघ्या ६ तासांच्या आत गुन्हे शोध विभागाने ध्रुव शाहू याला अटक केली.
गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रियांशू उर्फ बाबू याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मानकापूरातील पाच लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. बाबू छत्रीचा खून करणारा ध्रुव साहू याच्या विरोधातही जरिपटका पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

झुंडमध्ये होती बाबूची भूमिका

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या झुंड चित्रपटाचे नागपुरातल्या गड्डीगोदाम परिसरातील झोपडपट्टीत चित्रिकरण झाले होते. या चित्रपटात प्रियांशू क्षत्रियने बाबू नावाचे पात्र साकारले होते. त्यानंतही प्रियांशूच्या गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा झाली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या अगदी काही दिवसांतच प्रियांशूला पोलिसांनी पाच लाख रुपयांच्या दागीने चोरी प्रकरणात अटक केली होती. या खेरीज त्याच्याकडून गड्डीगोदाम परिसरातल्या एका कबुतराच्या पेटीतून पोलिसांना चोरीच्या वस्तू सापडल्या होत्या.

कोण होता हा प्रियांशू

प्रियांशू हा एक चांगला फुटबॉलपटू होता. याच फुटबॉलमुळे त्याची झुंड या चित्रपटासाठी निवड झाली होती. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यासाठी त्याने चोरी सुरू केली. प्रियांशूचे वडील रोजंदारी मजूर आहेत. त्याला तीन मोठ्या बहिणीही आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.