Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाच घ्या आणि प्रमोशन मिळवा! लाचखोर अधिकारी बनला तीन खात्यांचा प्रमुख

लाच घ्या आणि प्रमोशन मिळवा! लाचखोर अधिकारी बनला तीन खात्यांचा प्रमुख

रत्नागिरी:- लाचखोर व वादग्रस्त ठरलेल्या एका अधिकार्‍याला रत्नागिरी जिल्हा परिषदेने एक नव्हे तब्बल तीन विभागांचा प्रमुख केला आहे. विशेष म्हणजे या अधिकार्‍याची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.


असे असतानाही जि. प. प्रशासनाने ही किमया केली आहे. याबाबत आता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत विविध कर्मचारी संघटना आवाज उठवण्याची शक्यता आहे. एकंदरित लाच घ्या आणि प्रमोशन मिळवा, असा फंडा जि. प. ने राबवला असल्याची चर्चा सुरू आहे.

सोलापूर व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात हा अधिकारी वादग्रस्त ठरला होता. तसेच पाच वर्षांपूर्वी हा अधिकारी रत्नागिरीत होता. तेव्हाही तो वादग्रस्त ठरला होता. या नंतर त्याची बदली कोल्हापूर येथे आणि त्यानंतर सोलापूर येथे झाली होती. सोलापूर येथे सेवा बजावत असताना या वादग्रस्त अधिकार्‍याने 31 ऑक्टोबर 2022 रोजी 50 हजार रुपयांची लाच घेतली होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर हा अधिकारी चांगलाच चर्चेत आला. या अधिकार्‍यावर कारवाई करत त्याला अटकही करण्यात आली. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली खरी, परंतू सध्या त्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एका योजनेचा अधिकारी म्हणून परत पाठवला. गेले वर्षभर तो येथे काम करत आहे.

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी त्याला एका खात्याचा विभागप्रमुख करण्यात आला. त्यानंतर आता बुधवारी दुसर्‍या खात्याचासुद्धा पदभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तो तीन विभागाचा खातेप्रमुख आहे. या अधिकार्‍याची सध्या विभागीय चौकशी सुरु आहे. लाचखोर अधिकार्‍याबरोबरच तो बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुद्धा अडकलेला आहे. असे असताना त्याला तीन खात्याचा प्रमुख करण्याचा निर्णय अजब व गजब आहे. या निर्णया विरोधात अनेक कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत या बाबत आंदोलन होण्याची शक्यता आहे. जि. प. च्या भूमिकेमुळे एकंदरित कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

5 कोटी 85 लाखांची बेहिशोबी मालमत्ता

या लाचखोर अधिकार्‍याचे अनेक पराक्रम हळूहळू पुढे येत आहेत. सध्या पोलिस तपास सुरू असून, या तपासात भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 5 कोटी 85 लाख 85 हजार 626 रुपयांची माया जमविली आहे. या नंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. विशेष म्हणजे या अधिकार्‍याच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 50 कोटींपेक्षा अधिक संपत्ती जमविल्याची माहिती सांगितली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.