खासदारांमुळे सांगली काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्षपदाचं घोडं अडलं? निवडणुकीच्या तोंडावर कदम- पाटलांचं एकमत होईना
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि जिल्हावासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नसल्याने कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे.
काँग्रेसच्या शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रदेश काँग्रेसकडे काही नावे पाठवण्यात आली आहेत, असे सांगितले जाते. मात्र, 'प्रदेश'कडून निवडी थांबल्या आहेत की 'अपक्ष' खासदार विशाल पाटील यांच्याकडून एका निश्चित नावावर शिक्कामोर्तब होत नाही. याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर रिक्त झालेले काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्षपद गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जैसे थे राहिले आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती व महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसच्या गोटात अध्यक्षपदाबाबत अद्याप हालचाली नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. काँग्रेस कमिटीत ऊठबस वाढली आहे, मात्र, पक्षाला शहर-जिल्हाध्यक्षच मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्याकडे 2014 ला पद आले होते. ते जवळपास अकरा वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर रिक्त जागी माजी नगरसेवक असलेल्या जाणत्याची निवड केली जाईल, असे संकेत आमदार विश्वजित कदम यांनी दिले होते. विशाल पाटील यांचा सूर तोच होता, मग घोडे कशात अडले आहे.
याबाबत स्पष्टता होताना दिसत नाही. प्रदेश काँग्रेसकडे काही नावे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विश्वजित-विशाल यांच्यात एकमत असेल तर 'काही' नावे कशासाठी? एकच अंतिम नाव का पाठवले नाही? अंतिम नावाबाबत शिक्कामोर्तब का केले जात नाही, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत.
काँग्रेसचे जिल्ह्याचे नेतृत्व विश्वजित कदम करतील, असे विशाल दररोज न चुकता सांगतात. मात्र, अलिखित वाटप पत्रानुसार सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांची जबाबदारी वसंतदादा कुटुंबाकडे आहे. त्यामुळे सांगली-मिरजेचा शहराध्यक्ष विशाल यांच्या मतानुसारच ठरेल, अशी चिन्हे आहेत. त्यातून विश्वजित-विशाल यांच्यात एकमत होत नाही का, असाही मुद्दा चर्चेला आला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
इच्छुकांचे लक्ष काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष
पदासाठी राजेश नाईक, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, अय्याज नायकवडी, मयूर पाटील आदी नावांची चर्चा झाली आहे. 'कुणाचीही निवड करा, मात्र लवकर जाहीर करा, ' अशी मागणी या पाचही जणांनी केली होती. त्याला आता दीड महिना उलटला. काँग्रेसचे अद्याप ठरेना.
दरम्यान, या संदर्भात आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील या संदर्भात बोलण्यास टाळाटाळ केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.