Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाचखोर ट्रॅफिक पोलीस पैसे घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा, तरुणांनी कसा केला पर्दाफाश?

लाचखोर ट्रॅफिक पोलीस पैसे घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा, तरुणांनी कसा केला पर्दाफाश?
 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात वाहतूक पोलिसांच्या गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठवडा बाजार परिसरात एका वाहतूक पोलिसाने वाहनचालकांकडून बेकायदेशीररीत्या दंड वसूल करून ती रक्कम एका टपरीवाल्याकडे जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश काही जागरूक तरुणांनी केला असून त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढून करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की, संबंधित नागरिक वाहतूक पोलिसाला लाचखोरीबाबत प्रश्न विचारताना दिसत आहेत. शिवाय टपरीवाल्याने देखील याबाबतची कबुली दिली आहे. संबंधित वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून रोख रक्कम घ्यायचा आणि माझ्याकडे जमा करायचा, असं टपरीवाल्याने पोलिसासमोर सांगितलं आहे. टपरीवाल्याच्या खुलाशानंतर नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक शिस्त राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातीलच काही कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लाचखोरी केली जात असल्याने संपूर्ण पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या घटनेमुळे रत्नागिरी पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे. 
 
शहरातील काही तरुणांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, "वाहनचालकांकडून बेकायदेशीर दंड आकारणे आणि तो टपरीवाल्याकडे ठेवणे म्हणजे सरळ लाचखोरी आहे. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे." व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा विषय शहरभर चर्चेचा झाला आहे. अनेक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत पोलीस विभागाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर काहींनी या घटनेमुळे रस्त्यावर पोलीसांबद्दलचा विश्वास कमी होत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित वाहतूक पोलीस कोणत्या विभागात कार्यरत आहे आणि त्याच्याकडे यापूर्वी अशा तक्रारी आहेत का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा रत्नागिरीतील वाहतूक व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नागरिकांनी आता अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि रस्त्यावर न्याय्य वर्तन करणाऱ्या पोलिसांनाच स्थान मिळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.