Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भाजपमध्ये मांडवली बादशहा फिरतोय...', प्रदेश सचिवाकडून इच्छुकांना सावधानतेचा इशारा

'भाजपमध्ये मांडवली बादशहा फिरतोय...', प्रदेश सचिवाकडून इच्छुकांना सावधानतेचा इशारा
 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांनी आपला मोर्चा महायुतीकडे वळवला आहे. महायुतीमधील भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असून जिल्हा परिषद आणि महापालिकेची जबाबदारी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे. मात्र भाजप मधील काही पदाधिकाऱ्याकडून इच्छुकांना शब्द देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी थेट अशा इच्छुकांना सावधानतेचा इशारा देत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरून इशारा दिला आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच भाजप कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत प्रदेश सचिव महेश जाधव यांनी इच्छुकांचा पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय जनता पक्षात काही मांडवली बादशहा फिरत आहेत. महापालिकेला तुझी उमेदवारी नक्की, तू कामाला लाग, असे सांगत आहेत; पण पक्षाची उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया आहे. 
 
निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारीवेळी प्राधान्य दिले जाईल. भाजपची उमेदवारी हॉटेलमध्ये नाही, तर पक्षाच्या कार्यालयातून दिली जाते,असा टोला महेश जाधव यांनी भाजप बैठकीत काही नेत्यांना लगावला. पक्षाची उमेदवारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडूनच नक्की होईल, असेही त्यांनी सांगितले.

'महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. चार जणांचा प्रभाग आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेते ठरवतील. तरीदेखील ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष असे मिळून 33 नगरसेवक होते. त्यामुळे 33 जागांवर आपला अधिकार आहेच. या जागांवर पक्षातील कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीची तयारीही केली आहे.




वर्षानुवर्षे ते पक्षाचे काम करत आहेत. आम्ही 32 वर्षे पक्षाचे काम केले; पण आता पक्षात मांडवली बादशहा फिरत आहेत. ते कार्यकर्त्याला सोडून दुसऱ्याच कोणाला तुझी उमेदवारी नक्की म्हणून सांगत आहेत, असंही जाधव म्हणाले. पक्षाची उमेदवारीची एक प्रक्रिया आहे. आरक्षण पडल्यावर प्रभागांचा सर्व्हे केला जाईल. त्यानंतर ज्याचे नाव आघाडीवर असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाईल.

यामध्येही निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे मांडवली बादशहांवर विश्वास ठेवू नका. ज्या ठिकाणी निवडून येणारे इच्छुक असतील त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. त्यावेळी कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून चालणार नाही. त्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे.' बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिक्कोडे, माजी नगरसेवक विलास वास्कर उपस्थित होते.

अध्यक्षांचा फोटो का नाही?
'पक्षातील काहीजणांनी भागात शुभेच्छांचे फलक लावले आहेत; पण त्यावर जिल्हाध्यक्षांचा फोटो का लावत नाहीत. हा संघटनात्मक रचना असणारा पक्ष आहे. इथे अध्यक्षांच्या निर्णयाला महत्त्व आहे. त्यामुळे अध्यक्षांचा फोटो फलकावर लावा. या पक्षात फलक लावून उमेदवारी मिळत नाही, तर काम करून उमेदवारी दिली जाते,' असंही जाधव म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.