Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत दोन गटात राडा:,पोलिसांनी जमावाला पांगवले: तणाव नियंत्रणात, एक जण ताब्यात

मिरजेत दोन गटात राडा:,पोलिसांनी जमावाला पांगवले: तणाव नियंत्रणात, एक जण ताब्यात

मिरज : भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने मिरजेत मंगळवारी रात्री जोरदार वादंग झाला. संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यानंतर जमावाने शहरात सर्वत्र दुकाने बंद करण्यास भाग पाडून, राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडत गोंधळ माजवणास सुरुवात केली.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी लाठीमार करत जमावास पिटाळून लावले. या घटनेमुळे मिरज शहरात तणाव निर्माण झाला. रात्री उशिरा मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.

मिरज शहरातील नदीवेस परिसरातील कोळी गल्ली परिसरात दोन समाजांतील एकमेकांच्या ओळखीचे तरुण मंगळवारी रात्री बोलत बसले होते. बोलता-बोलता दोघांनी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केले. यानंतर एका तरुणाशी संबंधित गटाने दुसर्‍या तरुणास बेदम मारहाण केली. यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पलायन करून एका ठिकाणी आश्रय घेतला. संतप्त जमावाने पुन्हा हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग केला. परंतु काही तरुणांनी त्याला पोलिसात हजर केले.

संबंधित तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी करत एक गट मिरज शहर पोलिस ठाण्यात जमला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. परंतु त्यावर जमावाचे समाधान झाले नाही. संतप्त जमाव संबंधित तरुणाच्या घराजवळ गेला. त्याच्या घरावर तुफान दगडफेक केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न यावेळी केला. परंतु संतप्त जमावाने नदीवेस परिसरात असणार्‍या राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडले.

तसेच काहीजणांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचादेखील प्रकार केला. त्यानंतर पोलिसांनी जमावास सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले. या घटनेमुळे मात्र शहरात एकच गोंधळ निर्माण झाला. मिरज शहर, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यांकडील पथकांसह दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा मिरजेत तैनात करण्यात आला आहे. जमावाने शहरात दगडफेक करत राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला.

मिरजेत प्रचंड तणाव

भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर मिरजेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. एक गट मोठ्या प्रमाणात मिरज शहर पोलिस ठाण्याबाहेर एकवटला. यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात तणाव होता.

जमावाकडून दुकानांवर दगडफेक

संबंधित तरुणावर कारवाई करावी, या मागणीसाठी जमाव नदीवेस परिसरातून मिरज शहर पोलिस ठाण्याकडे निघाला. यावेळी दिसेल त्या वाहनावर व दुकानावर हल्ला करण्यात आला. यावेळी संतप्त जमावाकडून दगडफेकीचादेखील प्रकार घडला. यामुळे तणाव निर्माण झाला.

पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांची धाव

मिरजेत तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तातडीने मिरजेस धाव घेतली. यानंतर संतप्त जमावाला, संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही वरिष्ठ अधिकारी मिरजेत ठिय्या मारून होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.