पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या एका भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी मरगळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता, पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे.
पोलिसांची भूमिका आणि गौतमीला नोटीस
अपघात ज्या वाहनाने झाला, ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने पुणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. अपघाताच्या वेळी गौतमी गाडीत नव्हती, असे प्राथमिक वृत्त असले तरी, वाहनाची मालक म्हणून तिची चौकशी होणे आवश्यक आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी मात्र या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांवर 'सेलिब्रिटी' म्हणून गौतमीला सहकार्य करत असल्याचा आरोप केला आहे. गौतमीच्या टीमने अपघातानंतर साधी चौकशीही केली नाही किंवा उपचारांसाठी मदत केली नाही, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. तसेच, अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा न करता ती लगेच हलवण्यात आली आणि पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला नाही, असा त्यांचा दावा आहे. काही माध्यमांतील वृत्तानुसार, अपघात घडला तेव्हा गौतमी कारमध्येच होती, असाही कुटुंबीयांचा आरोप आहे.
"त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?" - चंद्रकांत पाटील
जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मदतीसाठी विनंती केली. या भेटीनंतर पाटील यांनी तात्काळ कठोर भूमिका घेतली आणि थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावला. फोनवर त्यांनी अत्यंत आक्रमकपणे कारवाईचे निर्देश दिले. चंद्रकांत पाटील डीसीपींना म्हणाले, "त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? गाडी कुणाची तरी आहे की नाही? हा जो रिक्षावाला सीरिअस आहे, त्याचे काय? तुम्ही म्हणताय ती गाडीत नव्हती, पण कुणीतरी गाडी चालवत होतं ना? आता काय कारवाई करायची ते लगेच पाहा. गाडी जप्त करा."
दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
या अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. गौतमीच्या नावावर गाडी असल्याने, तिची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह
एका बाजूला गौतमी पाटीलच्या अपघात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी तातडीने डीसीपींना फोन करून तत्परता दाखवली, तर दुसरीकडे, याच पुण्यात नुकत्याच घडलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावर त्यांनी मौन बाळगले आहे. गौतमी पाटीलला पोलिसांनी बजावलेल्या नोटीसनंतर ती कधी चौकशीसाठी हजर होते आणि तिच्यावर किंवा तिच्या टीमवर नेमकी काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) या प्रकरणात आक्रमक झाला असून, त्यांनी गौतमीला अटक करण्याची आणि तिचे शो बंद करण्याची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.