५०० रुपयांच्या नोटांचा डोंगर सापडला! मालेगावात बनावट चलनाचा पर्दाफाश
नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांच्या २ हजार बनावट चलनी नोटा ( ५०० रुपयांच्या नोटा ) जप्त केल्या आहेत. ही कारवाई हॉटेल ए-वन सागर समोर, मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली..या प्रकरणी मध्यप्रदेशच्या बुरहानपूर येथील दोन आरोपी नाजिर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी यांना पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे.
या दोघांकडून दोन मोबाईल फोनसह एकूण 10.20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे काम तो करत असल्याचे सांगण्यात येते. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..
दरम्यान, होवू घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली असून या बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180, 3(5) प्रमाणे मालेगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात बनावट नोटा छापण्याचे प्रकार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली येथे देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता नाशिकच्या मालेगावमध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.