मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात नव्या तूफानाची चाहूल लागली आहे. जैन समाजाच्या नेत्यांनी 'शांतिदूत जनकल्याण पार्टी'ची स्थापना करून महापालिका निवडणुकीत थेट लढण्याची घोषणा केली असून, पक्षाचे निवडणूक चिन्ह 'कबुतर' असल्याचे सांगितले. ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा देणारी असून, शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
कबुतर सेना-भाजपला उडवून लावेल
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. "कबुतरामुळे महायुतीचे सरकार जाणार आहे. कांद्यामुळे काँग्रेसचे आणि कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार गेले, आता कबुतर सेना-भाजपला उडवून लावेल," असा खोचक टोला मुनींनी लगावला.
पार्टी भगवान महावीरस्वामींच्या तत्त्वांवर आधारित
जैन समाज हा महाराष्ट्रात उन्नती करणारा आणि सर्वाधिक कर भरणारा समाज आहे, असे मुनी निलेश म्हणाले. "आमची पार्टी भगवान महावीरस्वामींच्या तत्त्वांवर आधारित आहे. मी महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना मानतो. इतर नेत्यांना नाही," असा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
पागल नेत्यांना आवरा
पत्रकार परिषदेत मुनींनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना आवाहन केले, "पागल नेत्यांना आवरा. मराठी-गुजराती वाद करू नका. जैन समाज नेहमी ठाण्यात शिवसेनेच्या पाठीशी होता, पण आता पुरे. मी पक्षाचा प्रचारक नाही, जैन मुनी आहे. कबुतराच्या विरोधात उभे राहणाऱ्यांविरुद्ध आम्ही उभे राहू." या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांना मुनींनी प्रत्युत्तर दिले.
कबुतरावरून वाद का
"दारू-सिगारेटमुळेही मृत्यू होतात, पण कबुतरावरून वाद का" असा प्रश्न देखील जैन मुनी केला. नुकत्याच दादर कबुतरखान्यावर बीएमसीने घातलेल्या प्लास्टिक कव्हरमुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली. सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली कबुतरांना खायला देण्यावर बंदी घालण्यात आली, ज्याला जैन समाजाने तीव्र विरोध केला."प्राणी- पक्ष्यांवर दया ही घटनात्मक जबाबदारी आहे. न्यायालयाचे आदेश धार्मिक तत्त्वांशी विसंगत असतील तर आम्ही पाळणार नाही." बीएमसीच्या या निर्णयामुळे दादर येथे तणाव वाढला, पोलिस बंदोबस्त लावावा लागला आणि जैन कार्यकर्त्यांनी कव्हर फाडण्याचा प्रयत्न केला. ही घटना जैन समाजाच्या राजकीय जागृतीचे प्रतीक ठरली असून, त्यातूनच 'शांतिदूत जनकल्याण पार्टी'चा जन्म झाला.
औरंगजेबाचा मुद्दा मीच पहिल्यांदा उचलला
पक्षाचे ध्येय पक्षी, प्राणी आणि जनकल्याणावर केंद्रित आहे. "औरंगजेबाचा मुद्दा मीच पहिल्यांदा उचलला," असे मुनींनी सांगितले. ते म्हणाले, "मी फक्त योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना ओळखतो. त्यांना सांगतो, पागल नेत्यांना सांभाळा. जे कबुतराच्या विरोधात आहेत, त्यांच्याविरुद्ध आम्ही लढू." या पक्षाने मुंबई महापालिकेत उमेदवार देण्याची घोषणा केली. ज्यामुळे महायुतीला धोका निर्माण होईल. जैन समाजाची संख्या मुंबईत मोठी असून, ते मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात.
आम्ही उन्नती करणारे आहोत
मुनी निलेश म्हणाले, "जैन समाजाची ताकद कर भरण्यातून दिसते. आम्ही उन्नती करणारे आहोत, आता राजकारणातही." शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण अंतर्गत चर्चा सुरू आहेत. जैन समाजाच्या या हालचालीमुळे मुंबईत राजकीय चर्चा निर्माण झाली. ही नव्या पक्षाची एंट्री महायुतीला धक्का' ठरेल का? हे पाहणे महत्वाचे आहे. जैन समाजाच्या या राजकीय पदार्पणाने मुंबई महापालिकेची लढत आणखी रोमांचक होईल, हे निश्चित.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.