Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टॅक्सीवाल्याने गाडीत लावला असा QR कोड; स्कॅन करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु, नेमकं काय केलं?

टॅक्सीवाल्याने गाडीत लावला असा QR कोड; स्कॅन करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु, नेमकं काय केलं?

'आई-वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीही करू शकतात,' ही म्हण मुंबईच्या  एका टॅक्सी चालकाने  पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे.


या वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी निवडलेला अनोखा मार्ग सध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल झाला आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या गाडीत असा काही क्यूआर कोड लावला आहे की, स्कॅन करणारेही भावुक झालेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...

टॅक्सी ड्रायव्हरची भन्नाट आयडिया

स्वप्नांची नगरी मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर सध्या त्याच्या पुत्रप्रेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या टॅक्सीच्या पुढील सीटच्या  मागे एक क्यूआर कोड लावला होता. दिव्युषी नावाच्या एका महिला प्रवाशाला हा कोड दिसला, तेव्हा त्यांना तो पेमेंटसाठी असेल असे वाटले. पण जेव्हा त्यांनी चालकाला विचारले, तेव्हा मिळालेल्या उत्तराने त्यांना आश्चर्यचकित केले.

तो क्यूआर कोड पेमेंटचा नसून, त्यांच्या मुलाच्या यूट्यूब रॅप चॅनलचा होता, म्हणजे, जेव्हा-जेव्हा गाडीत नवी सवारी बसायची, तेव्हा त्यांच्या मुलाच्या चॅनलला एक नवा व्ह्यूअर मिळायचा. प्रवाशी दिव्युषी यांनी ही कथा एक्स वर फोटोसहित शेअर केली आणि काही क्षणातच ती व्हायरल झाली. दिव्युषी यांनी पोस्टमध्ये लिहिले, "ते काही मोठे श्रीमंत नव्हते, ना जास्त शिकलेले, पण त्यांच्याजवळ जे काही होते, त्याचा त्यांनी उत्तम वापर केला. त्यांनी आपल्या टॅक्सीला 'फिरते प्रमोशन चॅनल'  मध्ये रूपांतरित केले."

नेटकऱ्यांकडून कौतुक

सोशल मीडिया युजर्सने वडिलांच्या या समजूतदारपणाचे आणि प्रेमाचे जोरदार कौतुक केले आहे. एका युजरने "हे खरे मार्केटिंग आहे," असे लिहिले, तर दुसऱ्याने, "मुलासाठी वडिलांचे हे प्रेम मन जिंकून घेणारे आहे," अशी भावना व्यक्त केली. अनेकांनी या पोस्टला 'मुंबई स्पिरिट'चे  उत्तम उदाहरण मानले आहे. "मुंबई तुम्हाला विनम्र बनवते आणि प्रेरणाही देते.

येथे लोक मर्यादित साधनांतूनही मोठी स्वप्ने पाहतात. हीच खरी मुंबई आहे," असे एका युजरने लिहिले आहे. या टॅक्सी चालकाने आपल्या टॅक्सीद्वारे केवळ रॅप चॅनलचे प्रमोशनच केले नाही, तर 'बापमाणूस' म्हणून समाजाला एक मोठा संदेशही दिला आहे. या व्हायरल टॅक्सीवाल्या बापमाणसाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.