पुणे: दोन कोटींच्या लाच मागणी प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. चिंतामणी यांनी एका गुन्ह्यातील आरोपीच्या वडिलांच्या अर्जावर 'से' दाखल करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 46 लाख 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना पुण्यातील रस्ता पेठ येथे त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आशिलाच्या वडिलांवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. सुरुवातीला त्यांनी अर्जावर 'से' दाखल करण्यासाठी दोन लाखांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर चिंतामणी यांनी मागणीची रक्कम वाढवून थेट दोन कोटी रुपये मागितले. पैकी एक कोटी रुपये त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी तक्रारदाराला सांगितले.
या प्रकरणाची पडताळणी 27 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने केली होती. ठरल्याप्रमाणे 2 नोव्हेंबर रोजी रस्ता पेठ येथे पहिला हप्ता म्हणून 50 लाख रुपये देण्यात येणार होते. त्यावेळी 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंतामणी यांना सापळा रचून अटक करण्यात आली.या कारवाईत 46 लाख 50 हजारांपैकी दीड लाख रुपये खऱ्या नोटा आणि 45 लाख रुपये खेळण्यातील नोटा असल्याचे आढळले. प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.