Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गिरनारच्या 600 पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, महाराष्ट्रातील तरुणाचा जागीच मृत्यू; सर्वत्र हळहळ

गिरनारच्या 600 पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, महाराष्ट्रातील तरुणाचा जागीच मृत्यू; सर्वत्र हळहळ


रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवदर्शनासाठी गिरनार येथे गेलेल्या प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे (वय 46, रा.जानवळे, ता. गुहागर) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे गिरनारच्या 600 पायऱ्या चढल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

600 पायऱ्या चढल्यानंतर आला ह्रदयविकाराचा झटका

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद संसारे हे गुहागर येथील काही मित्रांसह गुजरातमधील गिरनार येथे दर्शनासाठी गेले होते. शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजता ते पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ शृंगारतळीत त्यांच्या नातेवाईकांना दिली.

क्रिकेट आणि स्पोर्ट्स बाईक चालवण्याची आवड
प्रसाद संसारे हे शृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठित 'रविंद्र स्टोअर्स'चे मालक होते. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने व्यापारी वर्ग, मित्रपरिवार आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रसाद हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते आणि दररोज क्रिकेट खेळण्याची त्यांना आवड होती. तसेच त्यांना नवनवीन दुचाकी मॉडेल्स चालवण्याचा छंद होता. त्यांचे गिरनार येथे जाणे हे अचानक ठरले होते. परंतु देवदर्शनाचा प्रवास अखेर त्यांच्या जीवनाचा शेवट ठरला. प्रसाद यांच्या निधनाने संपूर्ण गुहागर तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.