कोल्हापूर :-जुगार अड्ड्यावर कारवाई टाळण्यासाठी 70 हजारांची लाच; कॉन्स्टेबलसह पंटरवर गुन्हा
हुपरी : तीनपानी जुगार अड्ड्यावर कारवाई टाळण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल हुपरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे (बक्कल क्रमांक 885, वय 35, रा. नरदे ता. हातकणंगले) व पंंटर रणजित आनंदा बिरांजे (38, रा.आण्णाभाऊ साठे चौक, पट्टणकोडोली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर कॉन्स्टेबल शेटे फरार झाला असून पंटर बिरांजेला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी ही कारवाई केली.
येथील 925 /6 या अतिक्रमित वसाहतीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बिनधास्तपणे तीनपानी जुगार अड्डा सुरू होता. या अड्ड्यावर दोन दिवसांपूर्वी कॉन्स्टेबल संदेश शेटे याने छापा टाकला होता. यावेळी काही रक्कम व मोठ्या प्रमाणात गांजाही आढळल्याची चर्चा सुरू आहे. कारवाई करूनही कॉन्स्टेबल शेटे याने याबाबतचा रीतसर गुन्हा दाखल केला नव्हता. उलट त्या जुगार अड्डा चालकाशी चर्चा सुरू ठेवून कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तडजोड होऊन 70 हजार रुपयांवर तोडगा निघाला. दरम्यानच्या कालावधीत जुगार अड्डा चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला असता त्याला ही रक्कम पंटर बिरांजेकडे देण्यास कॉन्स्टेबल शेटे याने सांगितले. त्यानुसार पंंटर बिरांजेने रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडून अटकेची कारवाई केली. तर कॉन्स्टेबल शेटे हा फरार झाला आहे. कारवाईमुळे हुपरी पोलिसांच्या कारनाम्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही पोलिसांच्या अशाच पद्धतीच्या कारवायांची नागरिकांतून खुमासदारपणे चर्चा सुरू आहे.
परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात
केवळ सहा गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या हुपरी पोलिस ठाणे परिसरात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. गांजासह मावा व गुटखा गावागावांतील चौकाचौकात अगदी सहजरीत्या मिळत असल्याने तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. अवैध धंदे सुरू असल्याची माहीती स्थानिक पोलिसांना समजत नाही. पण स्थानिक गुन्हे अन्वेषणला समजते व त्यांच्याकडून कारवाई होते. याचा शोध वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घेणे गरजेचे आहे. अवैध धंदेवाल्यांकडून ठाण्यात बसलेले काहीजण नियमित हप्ता घेतात, अशी चर्चा आहे.
शपथेनंतर दोनच दिवसांत लाच
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी मी लाच घेणार नाही, प्रामाणिकपणे कार्य करीन, अशी शपथ घेतली होती. त्या शपथविधीनंतर केवळ दोनच दिवसांत लाचखोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.