गुन्हेगारीचे थैमान असताना पालकमंत्री चॉकलेट देण्यात व्यस्त :, येत्या 8 दिवसात अवैध बंद न झाल्यास तर 'एसपी' कार्यालयाला टाळे ठोकणार:, मनसेचे तानाजी सावंत यांचा इशारा
सांगली : सांगली जिल्हयात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र पक्षांतर करीत फिरत आहेत. येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पोलिस अधिक्षक कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायद्याचा ऱ्हास हा जनतेसाठी अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. अलीकडेच सांगली शहरात घडलेले दुहेरी खून प्रकरण आणि मिरज शहरातील गोळीबाराची घटना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेला सुरक्षिततेचा पूर्णपणे अभाव जाणवू लागला आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, दारू, गांजा, नशेच्या गोळ्या, ड्रग्स आणि जुगार व्यवसाय, राजकीय छत्राखालील बेकायदेशीर कामे खुलेआम सुरु आहेत. प्रशासन निष्क्रिय झाले आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र आपल्या पक्षात इतर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षांतर करीत फिरत आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही. पोलीस आणि प्रशासनावर राजकीय दबाव आणून चुकीच्या कामांना पाठबळ दिले जात आहे. परिणामी प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील काम करणे अवघड झाले आहे. आठ दिवसात अवैध धंदे बंद करण्यात यावेत, निष्क्रीय अधिकाऱ्यावर करावाई करण्यात यावी, गुन्हेगारांची न्यायालयीन चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा पोलिस अधिक्षक कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात येईल. यावेळी सुरेश टेंगले, विठ्ठल शिंगाडे, श्रीधर करडे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.