Big Breaking! अजित पवारांना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे 10 हून अधिक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. महायुतीतील संघर्ष काही दिवसांपासून तीव्र झाल्याचं दिसत असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र तयार झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फोडाफोडीबाबत थेट दिल्लीतील अमित शहा यांच्या समोर नाराजी व्यक्त केली होती.
आता भाजपाने आपला लक्ष अजित पवार यांचे होमग्राउंड असलेल्या पिंपरी-चिंचवडकडे वळवले आहे. पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत असून, भाजप शहरभर शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोहिमा राबवत आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या जवळपास 10 माजी नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय ताप वाढला असून, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे. 2017 मध्ये भाजपाने 77 जागांवर विजय मिळवला होता तर राष्ट्रवादीला 32 जागा मिळाल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळाल्यानंतर दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, महापालिकेत शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी भाजप सज्ज आहे. अधिकाधिक सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती तुटल्यामुळे भाजपाकडून 128 पैकी सर्व जागांवर उमेदवार देण्याचा पर्याय खुला झाला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार असल्यामुळे या भागातील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत. 32 प्रभागांमध्ये तिकीटासाठी मोठी स्पर्धा सुरू असून, ज्या प्रभागांमध्ये भाजप तुलनेने कमकुवत आहे, तिथे 'ऑपरेशन लोटस' राबवण्याचा विचार होत आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्थानिक निष्ठावंतांना संधी द्यावी; मात्र, राष्ट्रवादीचे आयात केलेले नेते घेतल्यास पक्षाच्या आतून नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.