Big Breaking ! ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा बिगुल ५ डिसेंबरपासून; मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वीच; प्रोग्राम कसा, वाचा...
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल पाच डिसेंबरपासून वाजणार आहे. राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. आता ते सगळेजण आठ-दहा दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होतील. त्या सर्वांचा हजर झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागविला आहे. त्यानुसार नोव्हेंबरअखेर दुसरा टप्पा जाहीर होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी महसूल व वन विभागाने ११२ तहसीलदारांची पदोन्नतीचे आदेश काढले. त्यातील काहींनी पसंतीपत्रे दिली असून अद्याप अनेक उपजिल्हाधिकारी बदलीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत.त्यामुळे निवडणूक आयोगाला जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा जाहीर करता आलेला नाही.त्यामुळे निवडणूक आयोगाने आता सर्व विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी किती हजर झाले आहेत याचा अहवाल प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवावा, त्याचा दैनंदिन अहवाल आयोगाला द्यावा, असेही त्या पत्रात नमूद आहे. नोव्हेंबरअखेर दुसरा टप्पा जाहीर करून पाच डिसेंबरपासून अर्ज स्वीकृतीचे नियोजन आहे. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी, सात दिवस अर्ज माघार, छाननी, अंतिम उमेदवार यादीसाठी असतील. प्रचारासाठी सहा दिवसांचा अवधी असेल आणि मतदान व मतमोजणी व विजयी उमेदवांराना प्रमाणपत्र वाटप, हे सगळे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
२९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होत आहेत. नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आता जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकदाच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत तिसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
निवडणुकांचे दोन टप्पे असे...
जिल्हा परिषदा
३२
पंचायत समित्या
३३१
निवडणुकीचा कालावधी
२३ ते २५ दिवस
महापालिका
२९
निवडणुकीचा कालावधी
२५ दिवस
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.