Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेजारी - शेजारी शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांचा फवारणी करताना विषबाधेमुळे एकाचवेळी मृत्यू

शेजारी - शेजारी शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांचा फवारणी करताना विषबाधेमुळे एकाचवेळी मृत्यू


चाकूर : चाकुर तालुक्यातील अजनसोंडा बु. येथे शेतात तुर व कापूस पीक फवारणी करताना दोन शेतकऱ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची संशयित दुर्दैवी घटना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडल्याचे समोर आले असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चाकूर तालुक्यातील अजनसोंडा येथील शेतकरी लिंबाजी निवृत्ती गवळे वय ५४ आणि अंगद ज्ञानोबा भालेराव वय ५८ हे दोघेही शेजारी शेतकरी होते. 

त्यांनी स्वतःच्या शेतात शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी तुर व कापूस पिकांवर तणनाशक फवारणी केली. परंतु फवारणीदरम्यान विषबाधा होवून काही वेळात त्यांची प्रकृती बिघडली, उलट्या झाल्यामुळे त्यातील अंगद भालेराव यांना हाळी तर लिंबाजी गवळे यांना चाकूरात खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने अजनसोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूने शेतकरी, गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकरी लिंबाजी गवळे वय ५४ आणि अंगद ज्ञानोबा भालेराव वय ५८ हे दोघेही अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा सर्व उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. शेतीबरोबरच ते रोजंदारीवर काम करीत होते. अचानक झालेल्या या घटनेने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दोन्ही शेतकऱ्यांवर शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नसून अहवाल आल्यावर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. लिंबाजी गवळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले तर अंगद भालेराव यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलं, दोन मुली असा परिवार आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.