रेठरे धरण : असे म्हणतात की प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी, आई व बापाच्या सुख आणि दुःखात मुलापेक्षा मुलगीच जास्त सहभागी असते याची प्रचिती एका दुख:द घटनेने आली. सुरूल (ता. वाळवा) येथे हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली.
माहेरी येऊन वडिलांचे पार्थिव दर्शन घेण्यास आलेल्या सविता प्रेमानंद चव्हाण (वय ३९) यांना वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका दिवसात वडील आणि मुलगी या दोघांच्या जाण्याने सुरूल व कुंभारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.सुरूलचे प्रतिष्ठित नागरिक गणपती बंडू वायदंडे (वय ८०) यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ही बातमी समजताच त्यांची विवाहित मुलगी सविता चव्हाण आपल्या माहेरी धावत आली. मात्र, वडिलांचे पार्थिव पाहताच त्यांना झालेल्या मानसिक धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही घटना पाहून उपस्थित नातेवाईक, महिला आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.गणपती वायदंडे यांच्यावर सुरूल येथे तर सविता चव्हाण यांच्यावर कुंभारगाव येथील सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले. वायदंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी तर सविता यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. एका कुटुंबावर ओढावलेला हा दुहेरी आघात सर्वांना स्तब्ध करणारा ठरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.