सौदी अरेबियात मक्काहून मदिनाला जाणाऱ्या बसची डिझेल टँकरला धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल १८ जणांचा समावेश आहे. १८ जणांमध्ये तीन पिढ्यांमधील सदस्य होते. हैदराबादच्या रामनगर इथं राहणाऱ्या कुटुंबातील १८ जणांच्या मृत्यूने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रामनगर इथले ७० वर्षीय नसीरुद्दीन त्यांच्या कुटुंबियांसोबत उमराह करण्यासाठी गेले होते. त्यांची ६२ वर्षीय पत्नी अख्तर बेगम, मुलगा सलाउद्दीन, तर तीन मुली अमीना, रिजवाना, शबाना आणि नातवंड यांच्यासह १८ जण बसमध्ये होते. कुटुंबातील सदस्य मोहम्मद आसिफ यांनी सांगितलं की ते मदिनाहून परत जाताना ही दुर्घटना घडली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस जळून खाक झाली. १८ जणांमध्ये ९ चिमुकली मुलं होती. आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे.शनिवारी ते भारतात परतणार होते. गेल्या शनिवारी ते उमराहसाठी भारतातून रवाना झाले. तिथं गेल्यानंतर सतत संपर्कातही होते. पण अचानकच सगळं संपलं. नसरुद्दीन यांच्या हैदराबादमधील घरात नातलगांचा आक्रोश मन हेलावणारा आहे. शेजाऱ्यांकडे ठेवलेली किल्ली उघडून नसीरुद्दीन यांची बहीण घरात गेली तेव्हा तिला अश्रू रोखता आले नाही. भावाचं सगळं कुटुंब संपलं असं म्हणत बहिणीनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली.बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले बहुतांश प्रवासी हे हैदराबादचे होते. रात्रीच्या वेळी दुर्घटना घडल्यानं प्रवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे आग लागल्यानंतर प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिलीय. या घटनेवर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दुर्घटनेमुळे खूप दु:ख झालं. ज्या कुटुंबियांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलं त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी असलेले लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. आपले अधिकारी सौदीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.