Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामूहीक राजीनाम्याचा इशारा

फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामूहीक राजीनाम्याचा इशारा


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दृष्टिकोनातून भाजपकडून विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. अशीच एक बैठक पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असाच पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अनेक इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पुण्यात भाजपमध्ये मेगा इनकमिंगची चर्चा आहे. या पक्षप्रवेशाची यादीही तयार करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

या प्रवेशांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फुलस्टॉप लावतील आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत संधी देतील, अशी भूमिका घेतील असं पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत असतानाच फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्ट्रॉंग इनकमिंग होणार असल्याचे सांगितले आहे.

फडणवीसांच्या या निर्णयामुळे अस्वस्थ झालेले भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आता निर्वाणीचा इशारा येऊ लागला आहे. खडकवासला मतदारसंघातील माणिकबाग येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा आमदार भीमराव तापकीर यांना दिला.

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे खडकवासला मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३३, ३४ आणि ३५ मधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पक्षाचे नवे-जुने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी उमेदवार आयात केले जातात; तसे यंदा केले जाऊ नये, जुन्या जाणते अनुभवी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी भूमिका मांडली. या बैठकीस सुरुवातीला आमदार भीमराव तापकीर उपस्थित नव्हते. मात्र, कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाल्याने फोन करून आमदारांना तत्काळ बैठकीच्या ठिकाणी बोलविण्यात आले.
आमदार आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी भाजपत सध्या असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यावी, पक्षासाठी आम्ही निष्ठेने काम करू. मात्र, गेल्या निवडणुकीत झाले त्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत आयात केलेले उमेदवार आमच्या माथी मारू नका. अन्यथा सामूहिक राजीनामे पक्षाकडे सुपूर्त करण्यात येतील, असा इशारा सर्व कार्यकर्त्यांनी दिला. या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असं आश्वासन तापकीर यांनी दिलं
गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थतेचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून निवडणुकीचं तिकीट मिळावं, अशी आस लावून बसलेले कार्यकर्ते इनकमिंगच्या चर्चांमुळे धास्तावले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची अशी आक्रमक भूमिका समोर येत असून निवडणूक जसजशी जवळ येईल आणि इनकमिंगचे वारे जोरदार वाहू लागतील, तेव्हा भाजप आपल्या नाराज कार्यकर्त्यांना कसं शांत करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.