Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ शिंदेंनी भाजपला ललकारले; रावणाची लंका अहंकारामुळे जळाली, एकाधिकारशाही मोडून काढणार

एकनाथ शिंदेंनी भाजपला ललकारले; रावणाची लंका अहंकारामुळे जळाली, एकाधिकारशाही मोडून काढणार


डहाणू (पालघर):  शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसत आहे. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात काही ठिकाणी थेट सामना होत आहे.

डहाणू येथील प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा अंहकार जाळायचे असल्याचे विधान केले आहे. यामुळे महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. शिवसेनेचे (शिंदे) मंत्री, खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात समांतर नेतृत्त्व भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून उभे केले जात आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्याच (शिंदे) पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर शिंदे आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला.

महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांची फोडाफोडी करु नये असा अलिखित नियम महायुतीमध्ये असताना भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 'सामंजस्य करारा'ला हरताळ फासले गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी फोडण्यात आले. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. शिंदेच्या आमदारांविरोधात लढलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश दिले जात आहेत. हा महायुतीतील अतंर्गत वाद मंगळवारी (18 नोव्हेंबर) मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने समोर आला. शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्याचे समोर आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.

शिवसेना (शिंदे) नेत्यांची नाराजी ही फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही तर एकनाथ शिंदेंनी लागलीच दिल्ली दौरा करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत ही नाराजी पोहचवली. राज्यातील भाजप नेत्यांना आवर घालण्याची विनंती केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात भेट घेतली. मात्र केंद्रीय पातळीवरुनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
डहाणू येथील नगरपरिषदेत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. डहाणूला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डहाणूमध्ये आपण सगळे एकाधिकारशाही विरोधात एकत्र आलेले आहोत. अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेले आहोत. रावणाला अहंकार होता, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली. आता तुम्हाला एकाधिकारशाही आणि अहंकार संपवायचा आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव घेतले नसले तरी डहाणूमध्ये त्यांची थेट लढत भाजपशी असल्यामुळे त्यांचा हा इशारा भाजपला असल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, येथील उद्योग वाढवण्यास प्राधान्य देऊ, स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न सोडवू, जुन्या घरांचे प्रश्न मार्गी लावू तसेच शहरासाठी युनिफाइड डीसीपीआरला मंजुरी देऊ, शहरात नवीन उद्यानं विकसित करू, आपला दवाखाना सुरू करू, नगर परिषदेच्या इमारतीला निधी देऊ, प्रदूषणमुक्त उद्योग धोरण राबवू, स्थानिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य देऊ अशी ग्वाही याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.