Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भयमुक्त सांगली साठी ठिय्या आंदोलन.

भयमुक्त सांगली साठी ठिय्या आंदोलन.


सांगली : वाढती गुन्हेगारी, नशेखोरी, अवैध व्यवसाय यामुळे सामान्य माणसामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सांगली भयमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अथवा नागरिकांना शस्त्र परवाने द्यावेत या मागणीसाठी मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सतीश साखळकर, शंभूराज काटकर, विशालसिंग रजपूत, आसिफ बावा, सागर घोडके, राजेश नाईक, विकास शेटे, चंदन चव्हाण, संजय पाटील आदी सर्वपक्षिय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळली असून गेल्या दहा महिन्यात साठहून अधिक खून झाले आहेत, तर गर्दी मारामारीच्या घटना वारंवार होत आहेत. हिंसक घटना प्रामुख्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरूणांकडूनच होत आहेत. तसेच महिलावरील अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. याला आळा घालण्याचे काम पोलीसांचे असूनही अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसत नाही. यामुळेच भयमुक्त सांगली हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध व्यवसाय, नशेखोरीचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरून चालत जाणार्‍या व्यक्तींना नशेसाठी लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रत्येक घटनेची पोलीस ठाण्यात नोंद होतेच असे नाही. नशेखोरावर तर कारवाई होण्याची गरज तर आहेच, पण नशायुक्त पदार्थाचा बाजार करणार्‍यांचाही बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. साखळकर व काटकर यांनी सांगितले.  या आंदोलनाची दखल घेत उप अधिक्षक संदीप भागवत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. या गंभीर घटनांची आपण दखल घेत असून नजीकच्या काळात कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन देत याबाबत शिष्टमंडळाची पोलीस अधिक्षकांशी चर्चा घडवून आणण्यात येईल असे सांगितले.
भयमुक्त सांगलीसाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्ह्यातील ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या तसेच इतर नशाखोरीविरोधात तातडीने व्यापक आणि कठोर ड्रग्जविरोधी मोहीम राबवावी. नशेच्या पदार्थांचा बाजार करणारी पुरवठा साखळी मोडीत काढावी, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणार्‍या साखळीचा बंदोबस्त करावा, जुगार अड्डे बंद करावेत, सीसीटीव्हीची तपासणी करून बंद कॅमेरे त्वरित दुरूस्त करावेत, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीसांची गस्त वाढवावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.