मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काऊन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं अॅड. सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय आल्यानंतर सरोदे यांनी ट्विट करुन मी पुन्हा येतोय! अशा शब्दांत पोस्ट केली आहे.
बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी असीम सरोदे यांच्यावर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी कारवाई केली होती. पण ही कारवाई अत्यंत टोकाची असल्याचा आरोप यापूर्वी सरोदे यांनी केला होता. पण हे प्रकरण खरोखरच वकिली व्यवसायाच्या गैरवर्तवणुकीचं आहे का? याबाबत सखोल चौकशी करुनच सनद निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत या निर्णयाला स्थगिती देताना बार काऊन्सिल ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे. तसंच यावर पुढील सुनावणी लवकरच घेण्यात येईल असं जाहीर केलं. बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या या स्थगिती आदेशावर व्यक्त होताना अॅड. असिम सरोदे यांनी ट्विट केलं असून "सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही. सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार! मी पुन्हा येतोय... असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेनेच्या पक्ष चिन्हाच्या खटल्यात उध्दव ठाकरे यांची बाजू मांडणाऱ्या असीम सरोदे यांची सनद अचानक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली होती. १२ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना या सुनावणीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आल्यानं यामागे राजकीय कट-कारस्थान असल्याचा संशय खुद्द सरोदे यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. सरोदे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन आपल्या केसबाबत बोलताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्षांविषयी टीकात्मक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं वकिलांच्या व्यवसायाला धक्का बसल्याचं कारण देत त्यांची सनद रद्द करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.