कोल्हापुरात आरोग्य मंत्री वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संतापले! प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश.
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) मधील कारभार हा चौफेर टीकेचा विषय बनला आहे. रुग्णांची हेळसांड, उपचार, शस्त्रक्रियांना दिरंगाई, रुग्ण, नातेवाईकांना दुरुत्तरे, बाह्य महागडी रक्त तपासणी, औषध आणण्यास भाग पाडणे असे प्रकार घडत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
काल ठाकरे शिवसेनेनेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर बोट ठेवल्यानंतर आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महिनाभराहून अधिक काळ शस्त्रक्रिया रखडणार असतील तर लोकांनी काय रस्त्यातच मरावेत का, असा उद्विग्न प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना थेट निलंबित करा, असे आदेश आबिटकर यांनी आदेश अधिष्ठात्यांना दिले.
ठाकरे शिवसेनेचे उप नेते संजय पवार यांनी रुग्णालयातील काही गैर कारभाराची प्रकरणे मांडून आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. तर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने रुग्णांना बाहेरून महागडी रक्त तपासणी करण्याच्या प्रकाराचा भांडाफोड केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर असे आरोग्यशी संबंधित दोन्ही मंत्री असताना शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णाची होणारी हेळसांड यावर टीकात्मक चर्चा होऊ लागली.
मुंबईहून आज कोल्हापुरात आल्यानंतर दुपारी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर थेट सीपीआर रुग्णालयात गेले. त्यांनी विभाग निहाय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रत्येक खात्यातील दोषांची यादी पाहून ते चांगलेच संतापले. विभागातील चुका वाचून दाखवत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. जिल्हा रुग्णालयातील एकंदरीत तक्रारीचे स्वरूप पाहून आरोग्य मंत्री आबिटकर यांनी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांना कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करावे असे आदेश दिले. आरोग्य मंत्री इतके संतापले होते की बैठकीच्या ठिकाणी अधिकारी चिडीचूप झाले होते.
मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयात घडलेल्या अपंग बोगस प्रमाणपत्र तसेच खाजगी रक्त तपासणी साखळी प्रकरण संबंधीत विभाग प्रमुखांशी चर्चा केली. रुग्णांची पिळवणूक यापुढे होता कामा नये तसेच अशा चुकीच्या गोष्टींमध्ये कोणताही विभाग आढळल्यास संबंधीत विभाग प्रमुखाला दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीपीआरमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याची स्पष्ट नाराजी यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनासमोर मांडली. यावेळी बांधकाम विभागामार्फत पायाभुत सुविधांची कामे सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. येत्या महिन्याभरात कामाचा वेग वाढवून स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षकांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.