बंगळुरू : कर्नाटक कॉंग्रेसमधील कथित सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडमध्ये येण्याची चिन्हे आहेत. सत्तासंघर्ष सुरूच राहिला तर कर्नाटक सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना बढती मिळावी यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी प्रयत्न सुरू केल्याचे मानले जाते. त्यातून सिद्धरामय्या विरूद्ध शिवकुमार अशा सत्तासंघर्षाला तोंड फुटल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती आहे. त्यावर बोट ठेऊन माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार बसवराज बोम्मई यांनी महत्वाचे भाष्य केले. कॉंग्रेसमधील संघर्ष सुरूच राहिला तर कर्नाटकमध्ये राजकीय गोंधळ वाढेल.सध्याच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन ते तीन फॉर्म्युले सुचवल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अर्थात, ते फॉर्म्युले सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना मान्य नसल्याचे समजते. त्यामुळे नवा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये दोन्ही नेत्यांना बाजूला ठेवून तिसरेच नाव पुढे येऊ शकते, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता पुढे आल्यास भाजप अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.