विटा : अनैतिक संबंधातून विट्यात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. साई गजानन सदावर्ते (वय 35) असे मृताचे नाव आहे. दोन दुचाकींवरून आलेल्या काही बुरखाधारी हल्लेखोरांनी थेट त्यांच्या मानेवर वार केले. ही घटना शनिवार, दि. 22 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साळशिंगे रस्त्यालगत आयटीआय कॉलेजसमोर घडली.
याप्रकरणी रात्री उशिरा एका हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आले. अमीर नजीर फौजदार (वय 30, रा. मिरज) असे संशयिताचे नाव आहे. अवघ्या तीन तासांत घटनेचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले. याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या आयटीआय कॉलेज परिसरात राहत होते. शनिवारी रात्री ते साळशिंगे रस्त्याने चालत निघाले होते. यावेळी त्यांच्या मागून दोन दुचाकींवरून तीन ते चार बुरखादारी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने सदावर्ते यांच्या मानेवर जोरदार वार केला. हल्लेखोरांनी चेहर्यावर आणि डोक्याला रुमालासारखे कापड बांधून चेहरा झाकून घेतला होता. हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सदावर्ते खाली पडताच हल्लेखोरांनी पलायन केले.हा प्रकार लक्षात येताच काहींनी तत्काळ सदावर्ते यांना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु मानेवरील जखम खोलवर असल्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक जयश्री कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री उशिरा संशयित अमीर फौजदार याला ताब्यत घेतले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विपूल पाटील म्हणाले, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आम्ही शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासात आहोत. एका हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. उर्वरित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.