Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'शालार्थ आयडी'साठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातच घेतली १ लाखाची लाच! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षण उपनिरीक्षक रंगेहाथ पकडला, वाचा सविस्तर...

'शालार्थ आयडी'साठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातच घेतली १ लाखाची लाच! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षण उपनिरीक्षक रंगेहाथ पकडला, वाचा सविस्तर...


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेतील सहशिक्षिका २०१६ पासून विनावेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. तो शालार्थ आयडी देण्यासाठी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे (वय ५७) याने एक लाखाची लाच मागितली होती.

ती रक्कम स्वत:च्या कार्यालयात स्विकारताना त्याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली असून उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सेवानिवृत्तीला एक वर्षच बाकी असताना मिरगणे लाचेच्या जाळ्यात अडकला आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठविला होता. हा प्रस्ताव 'ई- ऑफिस' प्रणालीतून विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यासाठी व तो मंजूर करून देण्यासाठी उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याने संबंधित शिक्षिकेकडे लाचेची मागणी केली होती. १७ नोव्हेंबरला पैशाची मागणी केली होती. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी तडजोडीअंती एक लाख रुपये द्यायचे ठरले.

त्या शिक्षिकेच्या पतीने यासंदर्भात पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भात पडताळणी केली. शुक्रवारी (ता. २१) मागितलेली लाच आज मंगळवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी सापळा लावला होता. त्यात मिरगणे अलगद अडकला. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि अटक केली.
कार्यालयातच स्विकारली लाचेची रक्कम

शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे (वय ५७) याने शालार्थ आयडी देण्यासाठी लाच मागितली होती. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने ती रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी त्याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी बरेच काही सापडल्याचेही सांगण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.