Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी

अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी


हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी झालेल्या थरारक ॲसिड हल्ला आणि छतावरून ढकलून देण्याच्या घटनेतील पीडित महिला ममता हिने अखेर काल रात्री उशिरा चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

या हल्ल्यात ममता ५० टक्के भाजली होती, तर छतावरून खाली पडल्याने तिच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. तिच्या मृतदेहावर आज मंडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही घटना घडवून आणणारा आरोपी पती नंदलाल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पती तुरुंगात आणि आईचा मृत्यू, अशा परिस्थितीत ममताची दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.

सैण मोहल्ल्यात राहणारी ४१ वर्षीय ममता आणि तिचा पती नंदलाल यांच्यातील कौटुंबिक वाद विकोपाला गेला होता. त्यांच्यातील वाद न्यायालयातही प्रलंबित होता. १५ नोव्हेंबरच्या रात्री नंदलालने ममतावर प्रथम ॲसिड हल्ला केला आणि त्यानंतर तिला छतावरून खाली ढकलून दिले.

गंभीर अवस्थेत तिला सुरुवातीला मंडीहून बिलासपूर येथील एम्स रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी पीजीआय चंदीगड येथे हलवण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून ममता मृत्यूशी झुंज देत होती. डॉक्टरांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास तिला मृत घोषित केले.

पतीसोबतच्या भांडणाचे व्हिडीओ केले होते शेअर
ममता सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर खूप सक्रिय होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते. हल्ला होण्याच्या अगदी आधीही तिने अनेक व्हिडीओ आणि पोस्ट फेसबुकवर शेअर केले होते. या पोस्टमध्ये तिची मानसिक वेदना आणि वैवाहिक जीवनातील ताण स्पष्टपणे दिसून येत होता.

एका व्हिडीओमध्ये तिने पतीसोबत झालेल्या भांडणाचे चित्रण केले होते. "माझ्या माहेरचे कोणीही घरी येऊ देत नाही, माझ्या भाऊ-भावजयीलाही येण्याची परवानगी नाही. कुणी पाहुणा आला की माझे पती त्याचे व्हिडीओ काढू लागतात आणि विचित्र प्रश्न विचारतात," अशी तक्रार तिने केली होती. 'तुम्ही हिला किती वर्षांपासून ओळखता?' किंवा 'तुम्ही आमच्या घरी का आलात?' असे प्रश्न विचारून नंदलाल पाहुण्यांना हैराण करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत होते.
'मी फक्त माझ्या मुलांसाठी जगतेय...'

ममताने एका भावनिक व्हिडीओत सांगितले होते की, लग्नाला २५ वर्षे झाली, पण पतीच्या वागणुकीत फरक पडला नाही. ती म्हणाली होती की, "मी फक्त माझ्या मुलांसाठी, खासकरून माझ्या मुलीसाठी जगत आहे." हल्ल्याच्या दिवशीही तिने 'काही लोक कोल्ह्यासारखे धूर्त असतात. सोबत राहूनही जळत राहतात, नातेही निभावतात आणि मनात वैरही ठेवतात,' अशा आशयाची पोस्ट केली होती.

'सासरी अंत्यसंस्कार नको' - ममताची अखेरची इच्छा
उपचारादरम्यान डॉक्टरांनी जेव्हा ममताचा जबाब नोंदवून घेतला, तेव्हा तिने एकच इच्छा व्यक्त केली होती की, तिचे अंत्यसंस्कार सासरी केले जाऊ नयेत. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. आता ममताचा मृत्यू झाल्याने आरोपी पती नंदलालवर लवकरच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.