महिला घरातून हॉस्पिटलला गेली, दुसऱ्या दिवशी रस्त्यावर बॉडी आढळली; आता धक्कादायक माहिती उघड, जवळच्या व्यक्तीने...
छत्रपती संभाजीनगर: कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात जाऊन येते, असं सांगून घरातून गेलेली 50 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी शरीरावर धारधार शस्त्राचे व्रण असलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ओळखीच्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची कबुली दिली आहे. ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात उघडकीस आली.
कांताबाई अनिल सोमदे (वय 51, रा.आडगाव सरक, तालुका छत्रपती संभाजीनगर) असं मृत महिलेच नाव आहे. तर मारुती नामदेव भुईगळ (वय 50, राहणार धानोरा, तालुका सिल्लोड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांताबाई सोमदे या कुटुंबासह आडगाव सरक येथे राहत होत्या. त्यांचे पती अनिल हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांच्या घरात दोन मुले, सुन असा परिवार आहे. दरम्यान गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी कांताबाई यांचा कान दुखत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात जाऊन येते सांगून घरातून गेल्या. त्यानंतर सकाळी 11 वाजता कुटुंबातील सदस्यांनी कॉल करून विचारपूस केली असता कांताबाई यांनी घाटी रुग्णालयात गोळ्या घेण्यासाठी रांगेत उभे आहे असं सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद आला. नातेवाईकांनी शोध घेतला असता शोध लागला नाही.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास करमाड हद्दीत अंजनडोह शिवारात रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. कांताबाई यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार असल्याचे व्रण आढळून आले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. मारुती भुईगळ हे मयत महिलेच्या ओळखीचे होते. महिला बेपत्ता झाली त्या दिवशी दोघे दिवसभर सोबत होते. त्यानंतर दोघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. या वादानंतर आरोपी मारुती हा धारदार शस्त्राने कांताबाईचा खून करून पसार झाला होता. पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत सह पोलिस निरीक्षक पवन इंगळे, संतोष मिसाळ, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, सम्राट सिंग राजपूत यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.