भाजपकडून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी फोडले जात असल्याने एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत धाव घेत अमित शाहांची भेट घेतली. अमित शाहांच्या समोर एकनाथ शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती आहे. रवींद्र चव्हाण हे शिवसेनेतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेत शिवसेनेत फूट पाडत असल्याची तक्रार त्यांनी केली. दरम्यान, शहा यांनी शिंदेंना फटकारत भाजपची पाठराखण केल्याची चर्चा आहे.
एका मराठी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेंनी भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची काळजी घ्या, असे तक्रार घेऊन गेलेल्या शिंदेंना शाहांनी सुनावले. महायुतीमध्ये एकमेकांवर टीका टाळून समन्वय ठेवा. जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे, मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालणे हे देखील योग्य नसल्याचे सांगत ते टाळण्याच्या सूचना देखील अमित शाहांनी शिंदेंना केल्या.
शहांकडून भाजपची पाठराखण
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शहांकडे केली. मात्र, आपले सर्व घडामोडींवर लक्ष आहे, असे म्हणत शाहांनी प्रदेश भाजपच्या कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. अमित शाहांनी आपण प्रदेश भाजपच्या मागे ठाम असल्याचा स्पष्ट संदेश दिल्याची देखील चर्चा आहे.
भाजपची स्वबळाची तयारी?
महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांनी शिंदेंसोबत युतीला विरोध केला आहे. ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई वगळता सर्वत्र भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने भाजपला शिंदेंची मदत लागण्याची शक्यता आहे. मात्र तेथे देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे.
शिवसेनेला सुरुंग...
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच सुरुंग लावला जात आहे. कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रभरातून शिंदेंच्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे भाजपमध्ये इन्कमिंग केले जात आहे. जिथे भाजप सक्षम आहे तेथे देखील शिंदेंच्या लोकांना पक्षात घेत शिवसेनेची ताकद कमी केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.